फोर्ट ऍडव्हेंचर ग्रुपची हरिश्चंद्र गडावरील शेंडी सुळक्यावरून राष्ट्र ध्वजाला मानवंदना

राजगुरूनगर- निसर्गसौंदर्याने नटलेल्या हरिश्चंद्रगडाला ’ट्रेकर्सची पंढरी’ असे म्हणतात. हरिश्चंद्रगडाचे मुख्य आकर्षण म्हणजे अजस्त्र कोकणकडा – सहयाद्री चे अदभुत असे रूप म्हणजे कोकणकडा. हरिश्चंद्रगड समुद्रसपाटीपासून १४२४ मीटर उंचीवर आहे. कोकणकड्याच्या पायथ्याच्या बैल पाडा या गावातून नळीची वाट आणि माकड नाळ अशा दोन वाटा गडावर जातात. त्यातील सर्वात अवघड अशी ही माकड नाळ आणि नाळेच्या शेवटी कड्यावर असणारा शेंडी सुळका. हा गडाच्या एका टोकाला लागून सुमारे १२० फूट उंचीचा “शेंडी सुळका” आहे. हा सुळका लक्षवेधी आहे. माकडनाळ मार्गे हरिश्चंद्रगडा वर जाताना या सुळक्यावर बऱ्याच गिर्यारोहकांची चढाईसाठी नेहमीच नजर असते. ठिसूळ दगड आणि निसरडा कातळ ही या सुळक्याची खास वैशिष्टय. एका बाजूला अवाढव्य पसारा असणारा हरिशचंद्र गड आणि दुसऱ्या बाजूला खोल अशी दरी. छोटासा दगड जरी निखळला तरी तो खोल दरीत जाऊन पडतो त्यामुळे गिर्यारोहकांची खडतर परीक्षा घेणारा असा हा सुळका. जवळपास चार तासांची माकड नाळ वाट मार्गे खडी चढाई त्यानंतर 2 तास अती कठीण श्रेणीतील प्रस्तरारोहण आणि पुन्हा चार तासांची उतरण असा दहा तासांचा खडतर प्रवास करून गिर्यारोहकांनी ही मोहीम यशस्वी केली. तिरंग्याला मानवंदना देत ही मोहीम राष्ट्र ध्वजाला आणि कोरोना योध्यांना समर्पित केली.

या मोहिमेचे नेतृत्व राजगुरुनगर चे अक्षय भोगाडे, नाशिकचे चेतन बेंडकुळी आणि हडपसर चे सचिन पुरी यांनी केले. सर्व सुरक्षा साधने आणि गिर्यारोहण तंत्राच्या सहाय्याने ही मोहीम पार पडली

गिर्यारोहण करताना लीड क्लाइंबिंग (रोप लावणे) हा सर्वात अवघड आणि महत्त्वाचा टप्पा असून त्यात खिंडीतून वाहणारे वारे, दाट धुके आणि खराब हवामान, वाऱ्याचा वेग इतका जास्त होता की सुळक्याच्या माथ्यावर उभे राहणेही कठीण जात होते आणि अशा आव्हानांचा सामना करत राजगुरुनगर च्या अक्षय भोगाडे यांनी या मोहिमेच्या यशात मोलाची भूमिका बजावली.

या मोहिमेत रवी कुंभार, हर्षवर्धन शिंदे, शांताराम गायकर, सुनील खानसे, शिवाजी घाग, गिरीश डेंगणे, स्वप्नील हेही सहभागी झाले होते.

मागील वर्षी याच दिवशी प्रजासत्ताक दिनी फोर्ट ऍडव्हेंचर टीमने महाराष्ट्रातील सर्वात कठीण 280 फूट उंचीचा वजीर सुळका सर केला होता. भविष्यात अशा अवघड मोहीमा यशस्वी पणे आयोजित करून येणाऱ्या पिढीला साहसी पर्यटन आणि गिर्यारोहण यांची आवड निर्माण व्हावी या दृष्टीने कार्य करणार असल्याचे ग्रुप चे मुख्य अक्षय भोगाडे आणि सचिन पुरी (यु ट्युबर sachinpurivlogs) यांनी सांगितले.

Previous articleप्रजासत्ताक दिनानिमित्त मेल्झेर कंपनीतील कामगार वर्गाकडून अनाथांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
Next articleमुंबई माता बाल संगोपन केंद्राच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप