जुन्नर ते गेटवे ऑफ इंडिया सायकल वारीचे यशस्वी आयोजन

नारायणगाव, किरण वाजगे

कोरोना तसेच ओमायक्रोन विषाणूने भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात थैमान घातले आहे. भारतात विशेषतः महाराष्ट्रात व त्यातही महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात अति लोकसंख्या ध्वनी, पाणी व हवा प्रदूषणामुळे ओमायक्रोन विषाणूला अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

या अनुषंगाने शिवनेरी अथलेटिक्स सोसायटी व युवा नेते अमित बेनके यांच्या संकल्पनेनुसार शिवजन्मभूमी जुन्नर ते गेटवे ऑफ इंडिया अशा सुमारे दोनशे नऊ किलोमीटर अंतराच्या सायकलवारी चे नुकतेच आयोजन करण्यात आले.

सायकल चालवा वसुंधरा व आप्तस्वकीयांना वाचवा असा अनोखा संदेश देऊन दिनांक २२ जानेवारी २०२२ रोजी नारायणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारापासून पहाटे पाच वाजता सायकल यात्रेला प्रारंभ झाला. मंचर, प्रदूषणाचे केंद्रबिंदू असणारे चाकण, औद्योगिक पट्टा तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी, नवी मुंबई ते गेटवे ऑफ इंडिया असा सायकल प्रवास पूर्ण करण्यात आला. जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या वतीने सर्वांचे स्वागत तसेच आमदार निवास मध्ये भोजनाची व्यवस्था करून या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

या सायकल मोहिमेमध्ये नारायणगाव येथील विक्रांत नागरी पतसंस्थेचे संचालक मुकेश वाजगे, उद्योजक प्रशांत गुंजाळ, शासकीय आश्रम शाळेचे प्राचार्य विलास साबळे, हेमंत चिखले,उमाकांत अवसरीकर, ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय सायकलपटू शंकर कचरे, सुभाष कुरे, वैभव लोंढे, विनय बनकर, ऋषी बेंडे, तेजस खानदेशी व सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला बालवीर व अवघ्या बारा वर्षे वयाचा स्वराज्य कराळे यांनी सतत १४ तासांचा प्रवास करत ही सायकल मोहीम यशस्वीरित्या पुर्ण केली.

Previous articleग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा लेखकांशी थेट संवाद
Next articleश्रीक्षेत्र ओझर येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन