ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा लेखकांशी थेट संवाद

नारायणगाव,किरण वाजगे

बालसंस्कार समूह महाराष्ट्र व ऍक्टिव्ह टीचर्स जुन्नर आयोजित “शनिवार फनिवार” कार्यक्रमाच्या २३ व्या भागात मराठी विषयाच्या बालभारती इयत्ता सातवीच्या गचक अंधारी पाठाचे लेखक सन्माननीय अशोक मानकर सरांना थेट प्रश्न विचारून मुलांनी सरांबरोबर गप्पा व चर्चात्मक संवाद साधला .या ऑनलाईन कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी उस्फुर्त सहभाग घेतला.

बालसंस्कार समुह महाराष्ट्र समूहाचे सदस्य नवनाथ सूर्यवंशी सरांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. तर शनिवार फनीवार टीमचे सदस्य प्रशांत ढवळे सर यांनी लेखक परिचय मध्ये मानकर सरांचा परिचय करून दिला. कार्यक्रमास सुरुवातीपासूनच मंत्रमुग्ध करणारे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनातील कुतूहल, जिज्ञासा व उत्सुकतेचे निरसन करून घेतले. मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत उत्तरे देऊन मुलांच्या ज्ञानात भर टाकली.”लेखन ही साधना आहे”असे सांगून सरांनी केलेल्या कथालेखन नाट्यलेखन यांची नावे सांगून लेखन कसे असावे याचे सुंदर वर्णन केले. विनोदी लेखन कसे सुचते? वाचकाला हसविण्यासाठी लेखकाला कसे गंभीर व्हावे लागते?याविषयी माहिती दिली. लहान मुले ही इतके छान प्रश्न विचारून संवाद साधू शकतात याबद्दल सरांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सरांना प्रश्न विचारण्यासाठी विद्यार्थ्यांचा अतिशय छान प्रतिसाद मिळाला. सदर कार्यक्रमात विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले.

लेखनाच्या माध्यमातून लेखक प्रत्येकाच्या मनात आपले स्थान निर्माण करत असतो. लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणे गरजेचे आहे. त्यासाठी मुलांनी जास्तीत जास्त वाचन करून आपला छंद जोपासावा असे मार्गदर्शन मानकर सर यांनी केले. सदर कार्यक्रमात कवी उत्तम सदाकाळ, संदीप वाघोले, सुदाम साळुंखे हे उपस्थित होते. यावेळी सुशीलाताई डुंबरे यांनीही उत्तम मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सरांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल शनिवार फनीवार टिमच्या वतीने आभार मानन्यात आले.

शनिवार फनीवार टिमच्या सदस्या संगिता ढमाले, उषा टाकळकर, शुभांगी पाडेकर ,भारती कनिंगध्वज आणि साईनाथ कनिंगध्वज यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. संयोजकांनी मानकर सरांचे तसेच सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी, लेखक ,कवी यांचे धन्यवाद मानले.

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्टद्वारे राज्यातील तमाशा कलावंतांसाठी एक कोटी रुपये आर्थिक मदत
Next articleजुन्नर ते गेटवे ऑफ इंडिया सायकल वारीचे यशस्वी आयोजन