यवतमध्ये महाराष्ट्र बँकेच्या ATM वर चोरट्यांचा डल्ला , तब्बल 23 लाखांची लुटली रोकड

योगेश राऊत, पाटस

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत या ठिकाणी एका एटीएमवर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे . अज्ञात दरोडेखोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडले आहे . यावेळी चोरट्यांनी एटीएममधील तब्बल 23 लाख रुपयांची रक्कम चोरुन नेली आहे . ही घटना यवत येथे पुणे सोलापूर महामार्गालत असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएम सेंटरमध्ये घडली आहे . या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे . याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , दौंड तालुक्यातील यवत गावातील महाराष्ट्र बँकेच्या एटीएमवर काही अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे . आरोपींनी गॅस कटरच्या सहाय्याने अलगदपणे एटीएम फोडलं आहे . यावेळी चोरट्यांनी एटीएममधील तब्बल 23 लाख 81 हजार 700 रुपयांची रोकड पळवली आहे . रविवारी रात्री अडीच ते तीनच्या सुमारास हा प्रकार घडला आहे . ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे . पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध घेतला जात आहे . पुणे ग्रामीण पोलिसांची गुन्हे शाखा आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे . या प्रकरणी एटीएम कॉन्ट्रॅक्टर विकास जालिंदर भगत यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी घटनास्थळाला भेट देऊन पोलिसांना सूचना केल्या . तत्पूर्वी घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नारायण पवार सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे व पोलीस पथकाने पाहणी केली . घटनास्थळी श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते . ,

Previous articleदौंड शहर अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीचा पदाधिकारी मेळावा संपन्न
Next articleसाठवण सिमेंट बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना फायदा-वीरधवल जगदाळे