राजमाता जिजाऊ आईसाहेबांना मानाचा मुजरा

राजगुरूनगर- सह्याद्री खोऱ्यात आरोहणासाठी आव्हानात्मक मानला जाणारा किल्ले लिंगाणा सर करीत टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी भगवा स्वराज्य धव्ज हाती घेत किल्ले रायगडा समोर नतमस्तक होत, राजमाता जिजाऊ आईसाहेबांना मानाचा मुजरा करीत, “जय जिजाऊ, जय शिवराय” घोषणा देत मोठ्या उत्साहात जिजामाता जयंती साजरी केली. या ठिकाणी अनाथांच्या माय सिंधूताई सपकाळ यांना तिरंगा फडकावित मानवंदना देत आदरांजली वाहण्यात आली.

या मोहिमेची सुरवात मोहरी  (ता. वेल्हा, जि.पुणे) येथून झाली. दोन तासांची पायपीट करून बोराट्याची नाळ उतार होऊन उजव्या बाजुला ट्रॅवर्स मारल्यावर रायलिंग आणि लिंगाण्याच्या खिंडीत पोहोचता येते.

पहिला १२ फुट चिमणी क्लाइंब केल्यावर अंगावर येणारे कडे चिकाटीने सर करीत पहिला अर्धा टप्पा पार केल्यावर उजव्या बाजुला गुहा तर डाव्या बाजुला पाण्याचे टाके आहे. येथून पुढे टप्याटप्याने तीन सरळसोट ९०अंशातील कातळकडे आरोहण केल्यावर बेलाग लिंगाण्याचे शिखर गाठता येते.

शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारा आणि दोन्ही बाजुला खोल दरी असलेला तब्बल एक हजार फूटी निसरडा खडतर आरोहण मार्ग, धुक्यात हरवलेला परिसर, हुडहुडी भरवणारी थंडी, अश्या सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या चेतन शिंदे, जॉकी साळुंखे, अर्चना गडधे, ज्ञानो ठाकरे, रोहित पगारे, सर्वेश भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी जाधव, व्यंकटेश बाले, रोहित शेटे, प्रज्ञा देशमुख, महेश जाधव, श्रेयश शेटे, युग पवार, अथर्व शेटे, डॉ.किरण सोनावणे, प्रदिप बारी, ऋषिकेश कुलकर्णी, आरोही सचिन लोखंडे (वय ६ वर्षे) आणि डॉ.समीर भिसे यांनी मोहीम फत्ते केली.

Previous articleपदवीधर शिक्षक संघटनेच्या दिनदर्शिकेचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते प्रकाशन
Next articleभाजपाच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अँड.मुलाणी यांचा राजीनामा