पारगाव शिंगवे येथे अवैद्य दारू विक्री करणार्‍यावर मंचर पोलिसांची कारवाई

मंचर- आंबेगाव तालुक्यातील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पारगाव शिंगवे येथील हॉटेल सानिकाच्या पाठीमागे अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्यांवर मंचर पोलिसांनी कारवाई केली असून त्याच्या जवळून सुमारे ३ हजार २४० रुपयांची देशी दारू व ३० हजार रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची झेन मोडेल ची गाडी जप्त करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद पोलीस जवान योगेश रोडे यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि.३) रोजी मंचर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. एस.कांबळे हे पोलीस टीम बरोबर पारगाव शिंगवे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदार मार्फत पारगाव शिंगवे येथे हॉटेल सानिका च्या पाठीमागे अवैधरित्या देशी दारूची विक्री होत असल्याची खात्रीशीर बातमी समजली होती. याबाबत त्यांनी लगेच दोन पंचांना बोलावून बरोबर असलेल्या पोलीस स्टाफला घेऊन घटनास्थळी जाऊन छापा मारला असता त्याठिकाणी एक इसम आपल्या चारचाकी वाहनातून देशी दारूची विक्री करत असल्याचे निदर्शनात आले. पोलिसांनी त्याला नाव विचारले असता त्याने त्याचे नाव आनंदा पोपट भोसले ( वय ३० मूळ रा.मंगोबा माळ, बिडणी ता.फलटण जि. सातारा ,सद्या रा.पारगाव ता.आंबेगाव पुणे ) असे सांगितले. पोलिसांनी त्याच्या वाहनाची तपासणी केली असता ३ हजार २४० रुपयांची देशी दारू मिळून आली आहे. पोलिसांनी दारू व ३० हजार रुपये किमतीची झेन मोडेलची गाडी जप्त केली आहे. सदर व्यक्तीवर दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

Previous articleट्रॅक्टरची ट्रॉली अंगावरून गेल्याने १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू
Next articleधक्कादायक! पुण्यात २९ वर्षीय महिला वकिलावर पोलिसानेच केला बलात्कार