९ लाख १४ हजार ४३२ रुपयांचा बनावट दारू साठा व मुद्देमाल हस्तगत

नारायणगाव ,किरण वाजगे

राज्य उत्पादन शुल्क विभाग, नारायणगाव कार्यालयाच्या वतीने छापा टाकून बनावट देशी व विदेशी दारूसाठा व एक टेम्पो हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती उत्पादन शुल्क निरीक्षक अर्जुन पवार यांनी दिली. गुरुवार दिनांक ३० रोजी रात्री करण्यात आलेल्या कारवाईमध्ये ९ लाख १४ हजार ४३२ रुपये किमतीचा देशी-विदेशी दारूचा साठा व एक टेम्पो हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील पंचमी हॉटेल जवळील कच्चा रस्त्याच्या कडेला ३० डिसेंबर रोजी रात्री बनावट देशी व विदेशी दारूचा साठा विक्रीसाठी येणार असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार सापळा लावून आरोपी सागर तुकाराम कतोरे व मयूर बाळासाहेब कतोरे (दोघेही रा. चिंबळी, तालुका खेड) या दोघा आरोपींना संबंधित अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. या कारवाईबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग, नारायणगावचे निरीक्षक अर्जुन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार ही बनावट दारू काळेवाडी ता. हवेली येथे बनवण्यात येत होती. त्या ठिकाणी उत्पादन शुल्क अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छापा टाकून दारू बनवण्यासाठी लागणारे स्पिरिट, इसेन्स, मशिनरी, बाटल्या, बुच व कच्चामाल यासह १४ देशी दारुचे बॉक्स व एक विदेशी दारुचे १ बॉक्स व टेम्पो ताब्यात घेतला.

Previous articleधक्कादायक ! पुणे पोलीस दलातील महिला पोलीस निरीक्षकाची आत्महत्या
Next articleकोव्हीडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बैलगाडा शर्यतींना स्थगिती