शौर्यदिन अभिवादन कार्यक्रम स्थळाची समाज कल्याण आयुक्तांकडून पाहणी

अमोल भोसले,उरुळी कांचन

शौर्यदिन अभिवादन कार्यक्रम स्थळाची समाज कल्याण आयुक्तांकडून पाहणी. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करण्याचे आवाहन. ऐतिहासिक जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम संदर्भात राज्य शासनाने प्रथमच नियोजन करण्याची जबाबदारी समाज कल्याण विभागाकडे सोपवली आहे. समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी (३०/१२/२१ रोजी समक्ष) कार्यक्रमस्थळाची पाहणी करून पूर्वतयारीचा आढावा घेतला. प्रसंगी बार्टीचे महासंचालक धम्मजोती गजभिये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. राज्य शासनाच्या गृह विभागाने परिपत्रकात नमूद केलेल्या सूचनांचे पालन होईल याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांनीदेखील कोविड नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन डॉ.नारनवरे यांनी केले.

अभिवादन कार्यक्रमांतर्गत १ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता मान्यवरांकडून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर समता सैनिक दल, महार बटालियन सेवानिवृत्त सैनिक, आर्मी सलामी व मानवंदना कार्यक्रम होणार आहे. जयस्तंभ सकाळी ८ वाजेनंतर सर्व अनुयायांना अभिवादनाकरिता खुले असणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलिस विभाग, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, पी.एम.पी.एल., राज्य परिवहन महामंडळ, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग, डॉ.बाबासाहेब आबेडकर संशोधन व प्रशिक्षन संस्था (बार्टी) पुणे, समाज कल्याण आयुक्तालय पुणे, महावितरण कंपनी, बीएसएनएल यांच्यासह विविध विभागांकडून नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून करण्यात येणार आहे.

Previous articleभिर्रर्रर्र….र्र..राज्यातील पहिल्या बैलगाडा शर्यतीसाठी तब्बल ७०३ मालकांची नावनोंदणी
Next article‘थर्टी फर्स्ट’ला भिमाशंकर परिसरात नाकाबंदी