हृदयरोग व सर्पदंशतज्ञ डॉ सदानंद राऊत यांना डॉ ज्योती प्रशाद गांगुली राष्ट्रीय पुरस्कार

किरण वाजगे, नारायणगांव

येथील हृदयरोग व सर्पदंशतज्ञ डॉ सदानंद राऊत यांना इंडियन मेडिकल असोशिएशन च्या वतीने प्रतिष्ठित डॉ ज्योती प्रशाद गांगुली या राष्ट्रीय पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

बिहार राज्यातील पाटणा येथे संपन्न झालेल्या आय एम ए च्या राष्ट्रीय अधिवेशनात हा पुरस्कार राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जे. ए. जयलाल (कन्याकुमारी) यांचे शुभहस्ते व सचिव डॉ जयेश लेले , नूतन राष्ट्रीय अध्यक्ष डॉ सहजानंद यांच्यासह इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

राष्ट्रीय अध्यक्ष डॉ सहजानंद यांचा शपथविधी समारंभ बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. याच कार्यक्रमात नारायणगाव च्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गेली तीस वर्षे डॉ सदानंद राऊत व डॉ पल्लवी राऊत हे पती पत्नी ग्रामीण व आदिवासी भागातील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा देत आहेत. हृदयविकार, सर्पदंश, विषबाधा झालेल्या अनेक रुग्णांना त्यांनी जीवदान दिले आहे. त्यांनी राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी देशात अनेक ठिकाणी जाऊन रुग्णसेवा केली आहे. विशेष म्हणजे केरळमधील पूरग्रस्तांसाठी १८ लाख रुपयांची सर्पदंशावरील लस मोफत पुरविली आहे. डॉ राऊत यांनी आय एम ए शिवनेरी जुन्नर ची स्थापना करून डॉक्टरांसाठी कार्यशाळा आयोजित केल्या व वैद्यकीय व्यवसायिकांचे प्रश्न सोडविण्यासठी प्रयत्न केले. हृदयविकार,मधुमेह, रक्तदाब, कुपोषण, सर्पदंश प्रतिबंधासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती केली या सर्व कार्यामुळे राष्ट्रीय पातळीवर दखल घेत आय एम ए च्या वतीने डॉ राऊत यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके तसेच आय एम ए महाराष्ट्र चे अध्यक्ष डॉ रामकृष्ण लोंढे, डॉ सागर फुलवडे, उपाध्यक्ष डॉ सुनील खिंवसरा, जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील अनेक डॉ व मान्यवरांनी डॉ राऊत यांचे अभिनंदन केले.

Previous articleजिंती येथील आदर्श माता अनुसया धेंडे यांचे निधन
Next articleअज्ञात वाहनाच्या धडकेत १९ वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू