लेखक डॉ.जयप्रकाश घुमटकर लिखित ‘बा’मन कांदबरी शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन

अमोल भोसले,पुणे

बा” मन या कादंबरीचे लेखक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे कोळीवाडा ते नौपाडा एक प्रवास अर्थात गोलघुमट हे आत्मकथनपर लिहिलेले पुस्तक त्याकाळी विशेष करुन गाजले होते, त्यानंतर त्यांनी लिहिलेल्या युगपुरुष डॉ . बाबासाहेब आंबेडकर शोध आणि बोध या प्रबंधाला तर त्यांना दिल्लीचा सर्वोच्च दलित साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला होता.

त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्मच का निवडला यावर ११ वर्षे संशोधन करुन त्यांनी बुद्ध धम्माच्या वाटेवर हे अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले. याही पुस्तकाने साहित्य वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली होती याही पुस्तकाला त्यांना दिल्लीचा सर्वोच्च दलित साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.
सलग दलित साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेले ते महाराष्ट्रातील साहित्यिकांपैकी एकमेव लेखक आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

त्यानंतर त्यांनी चित्रपट कसा काढावा ?, विद्रोही ज्योतिबा, विचित्र विश्व, तऱ्हेवाईक नातेवाईक , संमेलनाध्यक्ष निवडणूक लेखा जोखा अशी विविध विषयांवर पुस्तके लिहिली. पण प्रत्येक वेळी विषय वेगळा, मांडणी वेगळी, धाटणी वेगळी, परखड लिखाण व आपल्या सदसदवेकबुद्धीला जे पटले तेच लिहीत गेले. कोणाचीही भीडभाड न ठेवता समाजावरील होणाऱ्या अन्यायाचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यामधून उमटत होते. त्यामुळेच त्यांचे वेगळेपण सिद्ध होत होते. कित्येक नामवंत साहित्यिकांमधून त्यांनी आपले वेगळेपण कित्येक वेळा सिद्ध ही करुन दाखवले आहे. पद्य प्रांतातील त्यांचे पानगळीची सळसळ, टवाळकी, खिल्ली आणि बोचकारे हे कवितासंग्रह विशेष करुन गाजले होते, त्यामधील कवितांनी तर महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला होता. तर असे हे गद्य आणि पद्य अशा दोन्ही प्रांतात रममाण होणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ.जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट यांचे हे नवीन पुस्तक म्हणजेच “बा” मन नावाची कादंबरी मुंबईत प्रकाशित झाली आहे हे पुस्तक लिहायला त्यांना तब्बल ८ वर्षे लागली. कोणतेही पुस्तक लिहिताना ते सखोल अभ्यास केल्याशिवाय विषयाला हात घालीत नाहीत व लेखनही करीत नाहीत असा त्यांचा स्वभाव आहे.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्या खळबळजनक “बा”मन या कादंबरीचे माजी केंद्रीय संरक्षण मंत्री तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषविलेले तसेच आत्ताचे महाराष्ट्राचे मुख्य आधारस्तंभ शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कादंबरीचे नुकतेच मुंबईत मान्यवरांच्या हस्ते थाटामाटात प्रकाशन सोहोळा पार पडला. कोविडचे सर्व शासकीय नियम पाळून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुवाबाजी, भोंदू साधूंची लबाडी, तसेच अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे, भोळ्याभाबड्या जनतेला आणि विशेष करुन महिलांना आर्थिकदृष्ट्या नाडणारे पुजारी, भटजीबुवा आणि चुकीचा इतिहास लिहिणारे या सर्वांच्यावर परखड शब्दात ताशेरे ओढणारे लिखाण त्यांनी आपल्या पुस्तकात मुद्देसूद पणे मांडलेले आहेत आणि त्याचे दाखलेही पुराव्यानुसार दिले आहेत. हे विशेष होय त्यामुळे हे पुस्तक वाचनीय तर झाले आहेच पण चुकीचा इतिहास लिहिणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातल्यासारखे होईल, व इथूनपुढे तरी भावी पिढीला चुकीचा इतिहास सांगू नका अशी कळकळीची विनंती त्यांनी आपल्या पुस्तकात केली आहे.

पुस्तकाच्या नावावरुन ब्राह्मण समाजाच्या विरुद्ध आहे असे वाटते पण ते तसे नसून बा मन म्हणजे त्यांचे वेडे मन काय सांगते, मन अस्वस्थ कसे होते असा त्याचा अभिप्रेत अर्थ निघतो, हे ती कादंबरी बारकाईने वाचल्यावर कळते, दिसून येते, हे पुस्तक ब्राह्मण समाजा वर टीका करणारे नाही. हे ते सुरवातीलाच आपल्या मनोगतात प्रांजळपणे कबूल करतात, कारण ते स्वतः फक्त दोनच जाती मानतात स्त्री आणि पुरुष, आणि धर्मही एकच मानवतावादी धर्म मानतात, त्यामुळे ते कोणत्याही जातीपातीच्या विरुद्ध आहेत, असे म्हणण्याला वाव मिळत नाही, तरी अशा या पुस्तकाला पुण्याचे थोर विचारवंत माजी न्यायाधीश रावसाहेब झोडगे यांची प्रस्तावना लाभली आहे , हे विशेष होय. या छोटेखानी कार्यक्रमाला मराठी साहित्य मंडळाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे, महाराष्ट्र प्रदेश सचिव लेखिका वर्षा थोरात, विश्वस्त ज्येष्ठ कवी सुरेश लोहार कार्यकारीणी सदस्य प्रफुल गवांदे, अशोक मोरे , सागर मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यानंतर या पुस्तकाच्या प्रती शरद पवार यांना भेट म्हणून देण्यात आल्या पवार साहेबांनी या कादंबरीचे लेखक ज्येष्ठ साहित्यिक डॉ.जयप्रकाश घुमटकर आणि उपस्थितांचे कौतुक केले.

‘बा’मन या पुस्तकाचे लेखक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांनी तसेच आभार प्रदर्शन प्रदेश सचिव वर्षा थोरात यांनी सर्वांचे आभार मानले.

Previous articleविघ्नहर देवस्थान रस्त्यासाठी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांच्याकडून ११ लाखांचा निधी; नारायणगाव व ओझर येथे डॉ गोऱ्हे यांचा सत्कार
Next articleअखिल भारतीय मराठा महासंघाची पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर