विघ्नहर देवस्थान रस्त्यासाठी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांच्याकडून ११ लाखांचा निधी; नारायणगाव व ओझर येथे डॉ गोऱ्हे यांचा सत्कार

नारायणगाव,किरण वाजगे

श्री क्षेत्र ओझर (ता. जुन्नर) येथे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी आज श्री विघ्नहर गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रवेशद्वार ते मंदिर या रस्त्याच्या कामासाठी स्वत:च्या आमदार निधीतून ११ लाख रुपये देण्याचे जाहीर केले.
याप्रसंगी देवस्थानच्यावतीने डॉ.गोऱ्हे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, शिवसेना महिला जिल्हा संपर्कप्रमुख विजयाताई शिंदे, जुन्नर पंचायत समिती सभापती विशाल तांबे, तहसिलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले की, पर्यटन विभागाच्या माध्यमातून अष्टविनायक पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला असून पर्यटनाच्यादृष्टीने विकासकामांना गती देण्यात येत आहे. ओझर प्रवेशद्वार ते मंदिर असा आठशे मिटरचा रस्ता वर्षभरात काँक्रेटिकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. अष्टविनायक विकास प्रकल्पांतर्गत मंजूर निधीची पूर्ततादेखील लवकरात लवकर करण्यासाठी प्रयत्न करू असे सांगून प्रवेशद्वार ते मंदिर या रस्त्याच्या कामासाठी आमदार निधीतून ११ लाख रुपये देण्याचे जाहीर केले. देवस्थानाला भेट देणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा देण्यात याव्यात असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.

ओझर गावच्या सरपंच मथुरा कवडे, ओझर नं. २ च्या सरपंच तारामती कर्डक, देवस्थानचे खजिनदार कैलास घेगडे, विश्वस्त बी. व्ही. मांडे, आनंदराव मांडे, मंगेश मांडे, गणपत कवडे, विजय घेगडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी आमदार अतुल बेनके व देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश कवडे यांनी आमदार डॉ.गोऱ्हे यांचा विशेष सत्कार केला.

दरम्यान विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे पुण्यात परतताना नारायणगाव येथे शिवसैनिकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार शरद सोनवणे, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, सरपंच योगेश पाटे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, विकास तोडकरी, अनिल खैरे, निलेश गोरडे, सुजित डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleगोरख कामठे यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार प्रदान
Next articleलेखक डॉ.जयप्रकाश घुमटकर लिखित ‘बा’मन कांदबरी शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन