…अन्यथा स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आत्मदहन करणार

नारायणगाव ,किरण वाजगे

गेली दोन वर्ष कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वात जास्त फटका लोककलावंतांना बसला असून सर्व प्रकारचे लोककलावंत, तमासगीर तसेच विविध स्तरातील कलाकारांचे रोजगारा अभावी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सध्या सर्वत्र कोरोना प्रादुर्भाव कमी झाला आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख तसेच पोलिस महासंचालकांनी सुद्धा लोकनाट्य तमाशा सादर करायला हिरवा कंदील दाखवला आहे.

असे असताना पोलीस लोकनाट्य तमाशा करण्यासाठी परवानगी देत नाही. याउलट लोककलावंतांना व तमासगीरांना विनाकारण त्रास देत आहेत असा आरोप अनेक फड मालकांनी केला आहे.

सर्व तमाशा कलावंत मेटाकुटीला आले आहेत. यापुढे पोलिस प्रशासनाने येत्या १५ डिसेंबर पर्यंत तमाशा सादर करायला परवानगी दिली नाही तर, तिव्र आंदोलन करून कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आत्मदहन करणार असल्याचा इशारा मराठी तमाशा लोककलावंत परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव यांनी दिला आहे.

आता आत्मदहन करण्यासाठी शासनाने आम्हा लोककलावंतांना परवानगी द्यावी अशी मागणी देखील संभाजीराजे जाधव यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री व गृहमंत्री यांच्याकडे केली आहे.

Previous articleएमटीडीसी नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांसाठी अनुभवात्मक उपक्रम राबविणार
Next articleविद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीनुसार वस्तीगृहात प्रवेश देण्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश