डॉ.बाबासाहेबांचे नाव घेऊन राजकारण करण्यापेक्षा संविधानाला अभिप्रेत कार्य करा – प्रा. बाळकृष्ण काकडे

अमोल भोसले, उरुळी कांचन

धम्मक्रांती बुद्ध विहार शिंदवणे येथे धम्मक्रांती बुद्ध विहार, धम्म संदेश ग्रुप, बहुजन विकास ग्रुप, संघ नायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बोधीसत्त्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या परिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा आयोजित केली होती. अभिवादन सभेसाठी भीमराव धिवार (अध्यक्ष, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समिती पुणे), उमेश शिरवाळे (सचिव, वंचित बहुजन आघाडी शिंदवणे), संपतराव कांचन पाटील (संचालक, छत्रपती शाहू मराठा संस्था पुणे), विजय तुपे (सरचिटणीस, राष्ट्रवादी महा. राज्य सांस्कृतिक विभाग), अमोल भोसले (वार्ताहर, दैनिक केसरी ), इंजि. निलेश भोरे (संविधान प्रचारक, पुणे), प्रदीप साळवी (धम्म प्रचारक, पुणे), पुरुषोत्तम डोक्रस (धम्म प्रचारक, पुणे) यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमाची अध्यक्षता भाऊसाहेब शिंदे (संचालक, धम्मक्रांती बुद्ध विहार शिंदवणे) यांनी केली.

कार्यक्रमाची प्रस्तावना सिद्धार्थ शिंदे (माजी ग्रामपंचायत सदस्य शिंदवणे) यांनी तर आभार अक्षय शिंदे (अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी शिंदवणे) यांनी व्यक्त केले.

अभिवादन सभेत बोलताना बाळकृष्ण काकडे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज यांचे लोककल्याणकारी रयतेचे राज्य डोळ्यासमोर ठेऊन समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्यायावर आधारित भारतीय संविधानाची निर्मिती डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. संविधानात भारतीय म्हणून सर्व वंचित, शोषित घटकांना मूलभूत हक्क आणि अधिकार बहाल करत मानवी मूल्यांची जोपासना केली आहे. भारतीय मानवी विकासाचा जाहीरनामा म्हणजे भारतीय संविधान होय. संविधानात कलम ३४०, ३४१, ३४२ ओबीसी, एससी, एसटीसाठी निर्मिती करुन आरक्षण दिले. मराठा तसेच ओबीसी बांधवांनी भारतीय संविधान वाचलेच पाहिजे. केवळ बाबासाहेबांचे नाव घेऊन राजकारण करण्यापेक्षा भारतीय संविधानाला अभिप्रेत कार्य करणे हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल.”

याप्रसंगी बाळासाहेब नितनवरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, “भारतीय बहुजन समाजाने आपला आर्थिक विकासाचा पाया सक्षम करणे काळाची गरज आहे. आर्थिक सक्षमीकरणाची चळवळ हाती घेऊन व्यवसाय, उद्योगधंदे करुन युवक, महिला इतर घटकांना सहकार्य करत आर्थिक बांधणी करावी तेव्हाच समाजकारण व राजकारणाची मूळे मजबूत होतील.”

समारोप करताना प्रा. सदाशिव कांबळे म्हणाले की, “६ डिसेंबरला चैत्यभूमी अनुयायांसाठी खुली केली, त्याबद्दल विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो. सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून भारतीय संविधान हा आपला भारतीयांचा पवित्र राष्ट्रीय ग्रंथ आहे. घराघरात संविधानाचे पारायण करणे अत्यंत आवश्यक आहे. शिंदवणे हे गाव हवेली तालुक्यातील सुप्रसिद्ध गाव आहे. या गावाला संत परंपरा तसेच बौद्ध इतिहासाचा वारसा आहे. शिंदवणे हे बुद्धकालीन गाव आहे याचा आम्हांला सार्थ अभिमान वाटतो. सामाजिक आणि धाम्मिक उपक्रमात लोकसहभाग असावा. धम्मक्रांती बुद्ध विहार शिंदवणे मार्फत भारतीय संविधानाचा आणि बुद्ध धम्माचा प्रचार करण्यासाठी कटिबद्ध राहूत.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमराव शिंदे, रोहित शिंदे, निलेश शिंदे, अविनाश कांबळे, अनिल शिंदे, मंगेश शिंदे, शंकर शिंदे, रमेश कांबळे, देवा माने, दिलीप सोनावणे, विनोद शिरवाळे, सचिन शिरवाळे, रोहित सहाणी, लक्ष्मण कांबळे, प्रमिला सोनावणे, समीक्षा कांबळे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Previous articleटिळेकरवाडी येथे शेतकऱ्यांना मोफत सातबारा उताऱ्यांचे वाटप
Next articleरेटवडी येथे मोफत डिजिटल सातबारा वाटप