आळेफाटा येथे इलेक्ट्रॉनिक दुकानदाराला बंदुकीचा धाक दाखवून लुटले

नारायणगाव (किरण वाजगे)

आळेफाटा (ता. जुन्नर) येथे सोमवार (दि. ६) रोजी रात्री साडेनऊ ते साडे दहाच्या दरम्यान पाच ते सहा जणांच्या टोळीने अविनाश जालिंदर पटाडे यांच्या साई इलेक्ट्रॉनिक या दुकानांमध्ये बेकायदेशीर रित्या प्रवेश करून व पिस्तूलाचा धाक दाखवून १७ ते १८ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच मोबाईल, दुकानाची व गाडीची चावी पळवून नेली.

यानंतर हे चोरटे यावरच थांबले नाही तर त्यांनी दुकानाचे शटर लावून व बाहेरून कुलूप लावून पटाडे यांना कोंडून ठेवले. काही वेळानंतर मागील खिडकीतून पटाडे यांनी शेजारील दुकानदारांना आवाज देत घडलेली हकीकत सांगितली व शेजारी लोकांनी दुकानाचे शटर उघडून पटाडे यांना बाहेर काढले.

काही वेळानंतर घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे तसेच आळेफाटा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी भेट दिली. या घटनेचा पुढील तपास आळेफाटा पोलीस करीत आहेत.

दरम्यान बरोबर बारा दिवसांपूर्वी म्हणजेच २४ नोव्हेंबर रोजी १४ नंबर कांदळी येथे अनंत नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये सशस्त्र बंदुकधारी दोन चोरट्यांनी हल्ला करून गोळीबार केला होता या घटनेत व्यवस्थापक राजेंद्र भोर यांचा मृत्यू झाला होता. असे प्रकार सातत्याने जुन्नर तालुक्यात होत असल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे

Previous articleकेडगावमध्ये रेकॉर्डब्रेक ५१० जणांचे रक्तदान
Next articleग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषदेमध्ये स्विकृत सदस्यांची निवड करण्याची आनंद वैराट यांची आमदार अशोक पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी