वानरलिंगी सुळक्यावरून महाराजा यशवंतराव होळकरांना मानाचा मुजरा

राजगुरूनगर- श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांच्या २४६ व्या जयंतीचे औचित्य साधुन टीम पॉईंट ब्रेक एडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी सह्याद्री खोऱ्यात आरोहणासाठी कठीण श्रेणीत गणला जाणारा ४३०फुटी वानरलिंगी सुळका सर करीत महाराजा यशवंतराव होळकर यांना मानाचा मुजरा करीत भगवा स्वराज्य धव्ज फडकावत ही साहसी मोहीम दुर्ग सेवकांना समर्पित केली.

या मोहीमेची सुरवात महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या वाफगाव येथील होळकर वाड्यास होळकर वंशज असलेले योगेशराजे होळकर यांच्या उपस्थितीत नतमस्तक होऊन झाली होती.

नाणेघाट वस्ती (घाटघर, ता. जुन्नर, जि.पुणे) येथून एक तासांची पायपीट सुळक्याच्या पायथ्याला घेऊन जाते. हातांच्या आणि पायांच्या बोटांची मजबुत पकड करून आरोहण करावे लागते. आरोहणासाठी सुमारे एक तास लागतो.

आरोहणास सुरवात केल्यावर पहिला १००फुटी कातळमार्ग डावीकडे घेऊन जात पुन्हा उजवीकडे शिळा असलेल्या ठिकाणी घेऊन येतो. येथुन पुढे असलेला १००फुटी अंगावर येणारा ओव्हरहँगचा कातळमार्ग या मोहीमेतील सर्वाधिक कठीण टप्पा असल्याने गिर्यारोहकांची शारीरिक कस आणि चिकाटी तपासणारा आहे. शेवटी ६ फुट डावीकडे ट्रॅवर्स मारल्यावर ३० फुट आरोहण केल्यावर शिखर गाठता येते.

शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारा ९० अंशातील ४३० फुटी सरळसोट कठीण चढाई, ३३० फुटी रॅपलिंगचा थरार, पाहताक्षणीच मनात धडकी भरावी असे सुळक्याचे रांगडे रूप, एक चुकीचे पाऊल आणि खोल दरीतच विश्रांती असल्याने चुकीला माफी नाही असे हे ठिकाण, अश्या सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉईंट ब्रेक एडवेंचर्सच्या चेतन शिंदे, जॅकी साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ बावीस्कर, अर्चना गडधे, समीर देवरे, ज्ञानो ठाकरे, सचिन पिंगळे, मिथुन पऱ्हाड, अक्षय वाडेकर, प्रतिक शेटे, अनुराग शेलार, संजय सावंत, सचिन जाधव, शशिकांत पवार, राहुल भालेकर, अनिल गाडे, राम मोरे, विजय बधाले, ओंकार रौंधळ, आरोही सचिन लोखंडे (६ वर्षे) आणि डॉ.समीर भिसे यांनी मोहीम फत्ते केली.

Previous articleजुन्नर तालुक्याच्या पर्यटन वाढीसाठी प्राधान्य – अपर जिल्हाधिकारी विजय सिंह देशमुख
Next articleदौंडमध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त रॅलीचे आयोजन