लसीच्या प्रमाणपत्रावर फोटो छापायचा असेल तर मृत्यूच्या प्रमाणपत्रावर पण छापायची जबाबदारी घ्यायला हवी- खा डॉ.अमोल कोल्हे

अमोल भोसले, पुणे

“अगर जीत का सेहरा बंधवाना हो तो, पराजय का बोझ भी स्वीकारना होगा” जर लसीकरण प्रमाणपत्रावर फोटो छापायचा असेल तर मृत्यू प्रमाणपत्राची जबाबदारी पण घ्यायला हवी अशा शब्दांत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत बोलताना केंद्र सरकारला बजावले.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दुसऱ्या दिवशी बोलण्याची संधी मिळालेल्या खासदार डॉ. कोल्हे यांनी या संधीचा योग्य उपयोग करत सरकारला धारेवर धरले. यावेळी डॉ. कोल्हे यांनी कोणत्याही लढाईत सेनापतीने स्वतःचे उदाहरण समोर ठेवले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करताना पश्चिम बंगालच्या निवडणुकीत पंतप्रधानांच्या समक्ष कोविडच्या नियमांचा आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता याकडे लक्ष वेधताना पुढील काळात असा प्रकार होऊ नये, अगदी निवडणुका असल्या तरी अशी अपेक्षाही व्यक्त केली. त्याचबरोबर
कोविड विरोधातील लढाई लढणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, आशा वर्कर्ससह सर्वच कोविड योद्ध्यांची प्रशंसा केली. त्याचप्रमाणे केंद्र सरकारला लढाई जिकण्याचे श्रेय घ्यायचे असेल तर झालेल्या मृत्युंची जबाबदारीही घ्यावी लागेल असे स्पष्टपणे बजावले.

‘ओमिक्रॉन’बाबत आज देशभरात जनतेत व उद्योग व्यवसायात एक घबराटीची (panic setuation) परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व घटकांना दिलासा मिळावा यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट सूचना जारी कराव्यात अशी मागणीही खासदार डॉ. कोल्हे यांनी केली. त्याचबरोबर कोरोना संकटकाळात अनेक कंपन्या बंद पडल्या, अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात केली. त्यांच्या भविष्याबाबत आपल्याला विचार करावा लागेल असे सांगून डॉ. कोल्हे म्हणाले की, सर्वसामान्य व्यक्तीला लॉकडाऊनच्या काळातील ईएमआयमध्ये बँकांनी कोणतीही सवलत दिली नाही. मात्र भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा सर्वांगीण विचार करावा लागेल याची जाणीव खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्र सरकारला करुन दिली.

कोविड संदर्भात महाराष्ट्राने लढलेल्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे व प्रशासकीय अधिकारी यांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळून कोरोनावर नियंत्रण प्रस्थापित केले ते कौतुकास्पद असल्याची जाणीव संसदेला करुन देताना औरंगाबाद मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे, मुंबईचे मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल व पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे विशेष कौतुक खासदार डॉ. कोल्हे यांनी केले.

कोरोनामुळे बळी पडलेल्या माता-पित्यांच्या अनाथ मुलांसाठी लोकसभेतील गटनेत्या सौ. सुप्रियाताई सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राबवीत असलेल्या ‘राष्ट्रवादी जीवलग’ अभियानाची माहिती देऊन हे अभियान देशभर राबविण्याची मागणी केली. ‘जगदंब प्रतिष्ठान’च्या माध्यमातून सीएसआर निधीतून शासकीय मदतीशिवाय शिरुर लोकसभा मतदारसंघात ५ लाख नागरिकांचे लसीकरण करण्याची मोहीम खासदार डॉ. कोल्हे यांनी राबवली त्याची माहिती सभागृहाला दिली.

लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करता येईल का याचा विचार करावा. तसेच सीरम कंपनीकडे जगभरातून बुस्टर डोसची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर आपलं धोरण काय आहे? लहान मुलांच्या लसीकरणाची सद्यस्थिती काय आहे? अशा सर्वसामान्य जनतेच्या मनात असलेल्या प्रश्नांचा भडीमार खासदार डॉ. कोल्हे यांनी केला.

Previous articleपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीकरीता राजेंद्र कांचन यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Next articleजुन्नर तालुक्याच्या पर्यटन वाढीसाठी प्राधान्य – अपर जिल्हाधिकारी विजय सिंह देशमुख