डिंभा कालव्यात पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला जीवदान

किरण वाजगे ,नारायणगाव (ता. जुन्नर) येथील येडगाव नारायणगाव शिवेवर अंबादास उर्फ लक्ष्मण दत्तात्रय वाजगे यांच्या शेताजवळ असलेल्या डिंभा डाव्या कालव्यामध्ये सुमारे एक ते दीड महिने वयाच्या बिबट्याचा बछडा येथील शेतमजूर देविदास लहानु केदार यांना आढळला. आज सकाळी सकाळी शेतावर कामाला जात असताना देविदास केदार यांना बिबट्याच्या बछड्याचा ओरडण्याचा आवाज आल्यामुळे त्यांनी कॅनॉलमध्ये उतरून पाहिले असता त्यांना हा बछडा पाण्यात भिजलेल्या अवस्थेत आढळला.त्यांनी तात्काळ वन विभाग व बिबट रेस्क्यू टीमचे सदस्य किरण वाजगे यांना फोन करून याबाबत माहिती दिली. यानंतर येथील रेस्क्यू टीम चे सदस्य किरण वाजगे व रमेश सोलाट यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या बछड्याला ताब्यात घेऊन येथील वनपाल मनीषा काळे यांच्याकडे सुपूर्द केले.

यावेळी स्थानिक रहिवासी व नागरिकांना बिबट्या बरोबर सेल्फी व फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.यावेळी रेस्क्यू टीम सदस्य किरण वाजगे तसेच वनपाल मनिषा काळे यांनी या बछड्याला सिरींज ने पाणीदेखील पाजले. व माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रामध्ये या बछड्याला पुढील उपचारासाठी दाखल केले.

याप्रसंगी स्थानिक शेतकरी अंबादास वाजगे संदीप वारुळे महेंद्र डोके, लहानु केदार, विघ्नहर वाजगे, शिवा कोल्हे, अरुण भुजबळ, वनकर्मचारी खंडू भुजबळ, विश्वास शिंदे, सृष्टी वाजगे, ओम वाजगे, अगस्त्य वाजगे आदी ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.

बरोबर पंधरा दिवसांपूर्वी या ठिकाणी वाजगे यांच्या उसाच्या शेतामधून दोन बिबट्याचे बछडे खेळत खेळत येथील शेतमजुरांच्या अंगणात आले होते. तसेच काल (दि. २८ ) रोजी रात्री एक बिबट्याचा बछडा वाजगे यांच्या शेतापासून शंभर मीटर अंतरावर आढळला होता.
अशा पद्धतीने बिबट्या आणि मानव हे एकत्रितरीत्या जुन्नर तालुक्याच्या विविध भागात आता सातत्याने पाहायला मिळत आहेत.

Previous articleकंपनी व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करण्याची कामगारांची मागणी
Next articleअंडरपासच्या कामांना तातडीने मंजुरी देण्याची खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी