खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दखल घेतल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत बोगद्याचे काम पूर्ण

अमोल भोसले

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दखल घेतल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत राजगुरुनगर बाह्यवळण रस्त्यावरील भांबुरवाडी (वरची) येथील चासकमानच्या कालव्याच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून काल (दि.२७ रोजी) हा कालवा पाणी सोडण्यासाठी खुला करण्यात आला. त्यामुळे पिकांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राजगुरुनगर बाह्यवळण रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर भांबुरवाडी (वरची) येथून जाणारा चासकमानचा कालवा पूर्णपणे खोदण्यात आला होता. हे काम वेळेत पूर्ण होत नसल्याने शेती व पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. तसेच शेतीसाठी आवर्तन मिळणार का याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या संदर्भात वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्यांची दखल घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी दुसऱ्याच दिवशी भांबुरवाडी येथे सुरू असलेल्या कालव्याच्या बोगद्याच्या कामास भेट देऊन पाहणी केली. या पाहणीच्या वेळी डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व संबंधित कंत्राटदार यांना युद्धपातळीवर काम करुन १५ दिवसात कालवा पाण्यासाठी खुला करण्याचे निर्देश दिले होते. खासदार डॉ. कोल्हे यांच्या सूचनेनुसार कंत्राटदारांनी दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करुन काल कालवा खुला केला.

आवर्तनासाठी कालवा खुला झाल्याने शेतीसाठी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या विविध गावाच्या पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी पुरवठा होऊ शकणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून खासदार डॉ. कोल्हे यांनी जातीने लक्ष घालून हा प्रश्न सोडवून शेतकऱ्याला नुकसानीपासून वाचवले असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, आधीच शेतकरी अडचणीत आहे, अशावेळी पाणी उपलब्ध असताना केवळ कालव्याचे काम अपूर्ण असल्याने पाणी मिळू शकत नसल्याने शेतकरी व पाणीपुरवठा योजना अडचणीत येत असतील त्याची दखल घेण्यासाठी मला निवेदनाची आवश्यकता नाही. माझा शेतकरी, माझा ग्रामस्थ ही माझी प्रायोरिटी आहे. त्यामुळे मला ही अडचण समजताच ती तत्काळ सोडविण्यासाठी पावले उचलली. त्यामुळे निर्धारित वेळेत कालव्याच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले. याबद्दल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व संबंधित कंत्राटदार यांचेही मी आभार मानतो. अशाचप्रकारे सर्वांनी संवेदनशीलता दाखवून कामे केली तर नक्कीच आपल्या भागाचा विकास साधता येईल याची मला खात्री आहे, अशा भावना डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केल्या.

Previous articleनारायणगाव ते शिर्डी सायकलवारीत ३०० जणांचा सहभाग
Next articleमहात्मा फुले आधुनिक भारताचे शिल्पकार- डॉ. श्रीमंत कोकाटे