खोडद चौकातील हायमास्ट दिव्यांचे काम युद्धपातळीवर करुन हायमास्ट दिवे सुरू

अमोल भोसले,नारायणगाव – खोडद चौकात झालेल्या अपघातानंतर तातडीने पाहणी करून सुरक्षा विषयक उपाययोजना करण्याचे निर्देश खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी आज पाहणी केली. तसेच तिसऱ्या फेजमधील कामे होईपर्यंत तात्पुरत्या उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित कंत्राटदाराला दिले.

मंगळवारी संध्याकाळी नारायणगाव येथील खोडद चौकात अपघातात एका महिलेला जीव गमवावा लागला याची गंभीर दखल घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक श्री. चिटणीस व अन्य अधिकाऱ्यांना जागेवर जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज श्री. चिटणीस यांनी स्थानिक ग्रामस्थ, पत्रकार यांच्याशी चर्चा केली. खासदार डॉ. कोल्हे यांनी या ठिकाणी वेगमर्यादा, गतिरोधक आदींबाबत सूचना फलक लावावेत, दोन्ही स्पीडबेकरमध्ये रम्बलर स्ट्रीपची संख्या वाढवावी अशी सूचना केली होती. त्यानुसार तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश श्री. चिटणीस यांनी दिल्या.

खोडद चौकातील अंधार हे अपघाताचे कारण ठरत असल्याने युद्धपातळीवर हायमास्टचे मीटर बसविण्याच्या खासदार डॉ. कोल्हे यांनी महावितरणला सूचना दिल्यानंतर आज तातडीने चौकातील हायमास्ट दिव्यांच्या मीटरचे काम सुरू झाले आहे. तसेच तिसऱ्या फेजमधील कामासंदर्भात डॉ. कोल्हे हे मंगळवारी केंद्रीयमंत्री श्री. नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांचे स्वीय सहायक प्रबोधचंद्र सावंत व तेजस झोडगे यांनी दिली.

या पाहणीच्या वेळी खोडदचे ग्रामपंचायत सदस्य श्री. योगेश शिंदे, पत्रकार अशोक खरात, सूरज वाजगे, प्रशांत भुजबळ, संकेत डेरे, महावितरणचे श्री. कर्पे, मयत महिलेचे नातेवाईक श्री. विकास भोर, सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान गायकवाड, श्रेयस झोडगे, तेजस झोडगे आदी उपस्थित होते.

या दुर्दैवी घटनेत ज्या भगिनीचे निधन झाले, त्या भगिनीला श्रद्धांजली अर्पण करतो. भोर कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. बायपास चौक अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने नॅशनल हायवेच्या अधिकारी वर्गाला सकाळीच सूचना दिल्या होत्या. ही घटना समजल्यानंतर लगेच पाहणी करून तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चौकातील हायमास्ट एक दिवसात सुरू करण्याविषयी विद्युत विभागाला सक्त ताकीद दिलेली आहे. तिसऱ्या फेजमध्ये खोडद रोड भुयारी मार्गाचा प्रस्ताव पुणे विभागाकडून केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. मी स्वतः ३० तारखेला अधिवेशनादरम्यान माननीय नितीन गडकरी साहेबांची भेट घेऊन सदर भुयारी मार्ग लवकरात लवकर मंजूर करावा यासाठी पाठपुरावा करणार आहे.

हा भुयारी मार्ग होणे हीच या भगिनीला खरी श्रद्धांजली ठरेल. यापुढे कुणावरही अशी दुर्दैवी वेळ येणार नाही यासाठी पूर्ण प्रयत्न करेन असे. डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

Previous articleखोडद, हिवरे तर्फे नारायणगाव येथील ग्रामस्थ व नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांची बैठक
Next articleदौंड मध्ये भरदिवसा घरातून 5 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास