कांदळी येथे अनंत पतसंस्थेत भर दुपारी सशस्त्र हल्ला;गोळीबारात व्यवस्थापकाचा जागीच मृत्यू,गोळीबाराची घटना सीसीटीव्हीत कैद

नारायणगाव (किरण वाजगे)

१४ नंबर कांदळी ( ता. जुन्नर ) येथील अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेमध्ये बुधवार (दि.२४ ) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी आर्थिक लुटीच्या उद्देशाने गोळीबार केला. यामध्ये व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर (वय ५२) यांचा मृत्यू झाला आहे.

याप्रसंगी पतसंस्थेत व्यवस्थापकांसह पतसंस्थेच्या लिपिक अंकिता गणेश नेहरकर उपस्थित होते. त्या व मयत राजेंद्र भोर हे जेवण करत असताना दोन अज्ञात हल्लेखोरांनी मोटरसायकलवर येऊन त्यांना धमकी देत पैशाची मागणी केली .

 

यावेळी व्यवस्थापक भोर यांनी पतसंस्थेत पैसे नाही असे सांगताच दोघांपैकी एकाने भोर यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये भोर खुर्चीवरुन खाली कोसळले याचवेळी सुमारे अडिच लाख रूपये रोख रक्कम या दोघांनी लुटून नेली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की ,१४ नंबर, कांदळी येथील अनंत पतसंस्था ही पुणे नाशिक महामार्गा लगत आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास व्यवस्थापक राजेंद्र भोर व लिपिक अंकिता नेहरकर हे जेवण करत असताना दोन अज्ञात व्यक्तींनी पतसंस्थेत प्रवेश करून व्यवस्थापक राजेंद्र भोर यांच्याकडे पैशाची मागणी करत गोळीबार केला. हल्ला केल्यानंतर काही वेळातच पतसंस्थेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ भोर, गणेश नेहरकर, सुभाष भोर व प्रशांत भोर, जितेंद्र भोर यांनी जखमी राजेंद्र भोर यांना तात्काळ उपचारासाठी नारायणगाव याठिकाणी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी राजेंद्र भोर यांना मृत घोषित केले.

दरम्यान घटनास्थळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गिट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी तसेच अनेक पतसंस्थांचे पदाधिकारी व राजकीय व्यक्तींनी घटनास्थळी भेट दिली.

दरम्यान गोळीबार केल्याचे तसेच पैसे लुटून नेताना चे सीसीटीवी फुटेज पोलिसांना प्राप्त झाले आहेत. तसेच घटनास्थळी गोळीबार केल्यानंतर गोळीची कॅप मिळाली आहे. याप्रसंगी दहशतवादी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस फौजदार राजेश पवार तसेच श्वानपथक फिंगरप्रिंट तज्ञ पथक घटनास्थळी उपस्थित होते.
याबाबतचा पोलीस तपास चालू असून ग्रामीण भागात अशा प्रकारे दिवसेंदिवस पतसंस्था बँका लुटीचे प्रकार घडत चालल्यामुळे पतसंस्थांच्या व बँकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

Previous articleमहात्मा फुले साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सीताराम नरके यांची निवड : राज्यस्तरीय चौदावे संमेलन २७ नोव्हेंबरला खानवडीला होणार
Next articleऊस पाचट व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न