महात्मा फुले साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सीताराम नरके यांची निवड : राज्यस्तरीय चौदावे संमेलन २७ नोव्हेंबरला खानवडीला होणार

अमोल भोसले,उरुळी कांचन

खानवडी (ता.पुरंदर) येथे होणा-या चौदाव्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक सीताराम नरके यांची निवड करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड येथे झालेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाँ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन होणार आहे. अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.

महात्मा फुले यांच्या मूळ खानवडी गावी दि. २७ नोव्हेंबर रोजी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष अजिंक्यभैय्या टेकवडे असून निमंत्रक सुनीलतात्या धिवार आहेत.

श्री नरके हे साहित्य क्षेत्रात गेली वीस वर्षे काम करीत असून पोलिस खात्यात नोकरी करुन साहित्यात वेगळा ठसा त्यांनी उमटविला आहे. संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सजंय जगताप, माजी मंत्री विजयबापू शिवतारे, माजी आमदार अशोकराव टेकवडे, विजयराव कोलते, सुदामअप्पा इंगळे, दत्ताशेठ झुरुंगे. डाँ दिगंबर दुर्गाडे आदी उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात ग्रंथपूजन, उदघाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

सकाळी १० वा. संमेलनाचे उदघाटन होणार असून, दुपारी २ वा. समाजसुधारक महात्मा फुले या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक गुलाबराव वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून, योगिता कोकरे, डाँ जगदीश शेवते, डाँ बळवंत भोयर सहभागी होणार आहेत. सायंकाळी चार वाजता कवी बाळासाहेब गिरी यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन रंगणार आहे. कवी जगदीप वनशीव, सुनिता निकम सुत्रसंचलन करणार आहेत. यापूर्वी झालेल्या महात्मा फुले साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद साहित्य मार्तंड यशवंतराव सावंत, इतिहासाचार्य मा.म.देशमुख, म.भा.चव्हाण, प्रा.गंगाधर बनबरे, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, प्रा. रतनलाल सोनग्रा, डाँ सय्यद जब्बार पटेल, डाँ जयप्रकाश घुमटकर, दशरथ यादव, भा.ल.ठाणगे, रावसाहेब पवार यांनी भुषविले आहे. संमेलनाचे संयोजन राजाभाऊ जगताप, दत्तानाना भोंगळे, गंगाराम जाधव, शामराव मेमाणे, सुनील लोणकर, नंदकुमार दिवसे, दत्ता कड रवींद्र फुले, दत्ता होले करीत आहेत.

Previous articleमहावितरणचे अधिकारी व शेतकऱ्यांची एकत्रित बैठक
Next articleकांदळी येथे अनंत पतसंस्थेत भर दुपारी सशस्त्र हल्ला;गोळीबारात व्यवस्थापकाचा जागीच मृत्यू,गोळीबाराची घटना सीसीटीव्हीत कैद