कुंजीरवाडी, सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील अनाधिकृत बांधकामांवर पीएमआरडीएची कारवाई

अमोल भोसले,उरुळी कांचन

पुणे सोलापूर महामार्गावर हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी व सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील एकूण ६ अनाधिकृत बांधकामांवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने कारवाई करण्यात आली.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ही कारवाई केली. सदरील मालमत्तेविषयी सदरील मालकांना नोटिसा बजावल्यानंतर देखील ते उपस्थित न राहिल्याने कारवाई करण्यात आली आहे. कुंजीरवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील थेऊर फाटा येथील २ हजार चौरस फूटांची ५ अनाधिकृत बांधकामे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. तर सोरतापवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दीड हजार चौरस फुटांच्या अनाधिकृत बांधकामावरही कारवाई केली आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील बहुतेक गावांमध्ये अनाधिकृत बांधकामे सुरु आहेत. परंतु संबंधित अधिकारी केवळ मोजक्या व मोक्याच्या बांधकामावरच कारवाई का करतात ? हा एक गुलदस्त्यातीलच प्रश्न आहे. तसेच रस्त्याने येताना इतरही अनधिकृत बांधकामे होताना व झालेली दिसत असताना देखील याकडे जाणूनबुजून कानाडोळा का केला जातो अशी चर्चा कारवाईच्या वेळी जमा झालेल्या बघ्यांच्या गर्दीत ऐकायला मिळत होती. बांधकाम पाडण्याची कारवाई केल्यानंतर परत ते बांधकाम केले तर ते अधिकृत समजायचे का ? कारण अनेक ठिकाणी कारवाई नंतर पुन्हा नव्या जोमात कामे झालेली पाहण्यास मिळत आहेत. यामागील गणित नेमके काय असेल ? याविषयी खमंग चर्चा जनमानसात सध्या सुरू आहेत. संबंधित अधिका-यांनी सर्वांना एकाच नियमात बांधून कारवाई करायला हवी अशी चर्चा कारवाईच्या वेळी उपस्थित नागरिकांमध्ये सुरु होती.
यावेळी पीएमआरडीए कार्यक्षेत्रात बांधकाम करताना मिळकतधारकांनी परवानगी घेऊनच बांधकाम करावे. अन्यथा विनापरवानगी केलेल्या बांधकामावर कारवाई केली जाईल. तसेच यापुढील काळातही अनधिकृत बांधकामे हटविण्याची मोहीम तीव्र केली जाणार असल्याचा इशारा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिका-यांनी दिला आहे.

सदरील कारवाई करत असताना बांधकाम पाडण्यासाठी आणलेले पोकलेन मशीन राष्ट्रीय महामार्गावरून नेण्यात आले. यामुळे झालेल्या नुकसानीस नेमके कोणाला जबाबदार धरायचे हा एक अनुत्तरित प्रश्न आहे. सध्या या रस्त्यावरील टोलचे कंत्राट संपल्यामुळे या रस्त्याच्या डागडुजीकडे कुणाचेच लक्ष नाही. त्यातच पोकलेन मशीन महामार्गावरुन नेल्यामुळे रस्त्याचे नुकसान झाले आहे.

Previous articleमराठी चित्रपट निर्मात्यांच्या पाठीशी सरकारचे पाठबळ उभे करु – नाना पटोले
Next articleकानगावमध्ये हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस अभिवादन