नारायणगावात ऊसाच्या फडात बिबट्याचे बछडे दाखल

नारायणगाव (किरण वाजगे)

सातत्याने बिबट्याचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असलेल्या नारायणगाव व वारूळवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दोन शेळ्या एक बोकड व घोड्याचं शिंगरू ठार झाले. ही घटना आज दिनांक १३ रोजी पहाटे व रात्री घडली आहे त्याचप्रमाणे चक्क उसाच्या शेतातून दोन बछडे बाहेर येऊन खेळत असल्याचे येथील शेतकऱ्यांच्या मुलांनी पाहिले.

दरम्यान वारूळवाडी येथे एका मेंढपाळाच्या वाड्यावर हल्ला करून दोन शेळ्या व एक बोकड त्याने ठार केले. तर कोल्हेमळा शिवारातील एका मेंढपाळाच्या घोड्याच्या शिंगरावर हल्ला करून ठार केले दोन दिवसांपूर्वी देखील पिंपळगाव येथील वाणी मळा शिवारातील रंगनाथ गुळवे यांच्या शेतातील मेंढपाळाच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला.

नारायणगाव येथील प्रगतीशील शेतकरी लक्ष्मण उर्फ अंबादास दत्तात्रय वाजगे यांच्या उसाच्या शेताबाहेर आज दि. १३ रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास दोन बिबट्याचे बछडे निदर्शनास आले. नारायणगाव येडगाव च्या शीवेवर व येडगाव धरणाकडे जाणाऱ्या डिंभा डाव्या कालव्या लगत राहणाऱ्या लहानु केदार यांच्या घरासमोर व वाजगे यांच्या ऊसाच्या शेताबाहेर दोन बिबट्याचे बछडे खेळताना आढळले. या बछड्यांचे फोटोसेशन करुन येथे राहणाऱ्या मुलांनी त्यांना पुन्हा उसाच्या शेतात सोडून दिले.
दरम्यान येथे अनेक वेळा मोठा बिबट्या देखील येथील शेतकऱ्यांना तसेच लहानू केदार व त्यांच्या कुटुंबियांना सातत्याने दिसत असल्याचे केदार यांनी सांगितले.
मात्र येत्या महिन्याभरात येथील ऊस तोडण्यात येणार आहे. त्यामुळे येथे बिबट्याचे वास्तव असल्याने मोठा जटिल प्रश्न समोर उभा ठाकला आहे. यामुळे आता नेमके काय होईल हे येणारा काळच ठरवणार हे मात्र नक्की…!

दरम्यान नारायणगाव सारख्या शहरी भागालगत अनेक बिबट्यांचे वास्तव्य असल्याने त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त वन विभाग करणार का असा सवाल स्थानिक रहिवासी करत आहेत. यासाठी येथील अधिकाऱ्यांनी सुद्धा कार्यक्षेत्रात नेमून दिलेल्या ठिकाणी राहणे बंधन कारक असूनही येथील जे अधिकारी कार्यक्षेत्र सोडून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास आहेत, त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातच वास्तव्यास रहावे अशी मागणी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष नामदेव अण्णा खैरे यांनी केली दरम्यान आज सकाळी वनविभागाच्या वनपाल एम जे काळे, वनरक्षक रामेश्वर फुलवाड, खंडू भुजबळ यांनी घटनास्थळी भेट दिली.

Previous articleनारायणगावात ऊसाच्या  ऊसाच्या फडात बिबट्याचे बछडे दाखल
Next articleभाजपच्या ओबीसी शहर अध्यक्षपदी भानुदास जगताप यांची तर सचिन शेलार यांची भाजपच्या शहर विद्यार्थी उपाध्यक्षपदी निवड