दरोडेखोराला पकडणारे पोलीस कर्मचारी संदीप कदम यांचा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी विशेष पुरस्कार देऊन केला सन्मान

सचिन आव्हाड

दौंड तालुक्यातील पाटस येथे पाच ठिकाणी दरोडा टाकून धुमाकूळ घालणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील एका दरोडेखोरास पाटस पोलीस चौकीतील हवालदार संदीप कदम यांनी मोठ्या शिताफीने नागरिकांच्या मदतीने पकडले होते . संदीप कदम यांच्या या धाडसी कामगिरी बद्दल पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक डॉ . अभिनव देशमुख यांनी विशेष पुरस्कार देऊन संदीप कदम यांच्या सन्मान केला .

पाटस पोलीस चौकी चे पोलीस कर्मचारी संदीप कदम हे गस्त उरकून पोलीस चौकीत आले होते . त्यांना काही ग्रामस्थांनी घरी चोरी झाल्याबाबत त्यांना माहिती दिली . तात्काळ कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली .यावेळी त्यांना आणखी काही ग्रामस्थांनी पाटस गावठाण परिसरात चोरी झाल्याबाबत माहिती दिली .

यावेळी परिस्थिती लक्षात घेऊन हवालदार संदीप कदम यांनी ग्रामसुरक्षा दल आणि नागरिकांच्या मदतीने दरोडेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली .

संदीप कदम हे ग्रामसुरक्षा दलाचे जवान आणि ग्रामस्थांच्या मदतीने दरोडेखोरांचा शोध घेत असताना अचानक पाच दरोडेखोर त्यांच्या पासून काही अंतरावर बोळीतून बाहेर आले . कदम यांनी दरोडेखोरांना हटकताच दरोडेखोरांनी तेथून पळ काढला . दरोडेखोरांचा पाठलाग करीत असताना संदीप कदम यांच्या दिशेने दरोडेखोरांनी दगड आणि विटा फेकल्या . यात पायावर विट लागली . मात्र संदीप कदम यांनी या परिस्थितीतही धाडसाने एका दरोडेखोरास पकडले .यावेळी ग्रामसुरक्षा दलाचे जवान आणि ग्रामस्थांनी सदर दरोडेखोरास पकडून ठेवले . तर अंधाराचा फायदा घेत इतर दरोडेखोरांनी पळ काढला होता .

हवालदार संदीप कदम यांनी दरोडेखोरास पकडून केलेल्या धाडसी कामगिरी बद्दल कदम यांच्यावर सर्वच स्तरांतुन कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे . पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी संदीप कदम यांना विशेष पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे . यावेळी बारामती चे अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांसह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते .

Previous articleवारंवार पाठपुरावा केल्याने बोरीभडक पुलाचे काम सुरू- उमेश म्हेत्रे
Next articleदरोडेखोराला पकडणाऱे पोलीस कर्मचारी संदीप कदम यांचा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी विशेष पुरस्कार देऊन केला सन्मान