भागेश्वर सहकारी दुध उत्पादक संस्थेमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला – खा. डॉ. अमोल कोल्हे

नारायणगाव : किरण वाजगे

श्री भागेश्वर सहकारी दुध उत्पादक संस्थेमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने चांगला बाजारभाव मिळत असून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यात संस्थेचे योगदान उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी केले. वारूळवाडी येथे नुकत्याच झालेल्या भागेश्वर सहकारी दुध उत्पादक संस्थेच्या सभासदांना बोनस व मुक्ताई पतसंस्थेच्या सभासदांना किराणा वाटप शुभारंभ कार्यक्रमात खासदार डॉ. अमोल कोल्हे बोलत होते.

भागेश्वर संस्थेच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी निमित्त प्रति लिटर २ रुपये ५० पैसे प्रमाणे १९ लाख १२ हजार रुपयांचा बोनस व दहा टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. बोनस व लाभांश वाटपाचा लाभ तीनशे शेतकऱ्यांना होणार आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ यांनी दिली.

दिवाळी निमित्त येथील भागेश्वर सहकारी दुध उत्पादक संस्थेच्या सभासदांना बोनस व मुक्ताई पतसंस्थेच्या सभासदांना किराणा वाटपाचा शुभारंभ खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आकस्मित निधन झालेले संस्थेचे सेवक मारूती फुलसुंदर यांच्या पत्नीला दीड लाख रुपयांची मदत संस्थेच्या वतीने खासदार डॉ. कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आली.

या वेळी ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, मुक्ताई पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटे, उपाध्यक्ष सुरेश वऱ्हाडी, संचालक अरविंद मेहेर, बबनराव कानडे, संध्या भुजबळ, सुरेश काळे, मारुती अडसरे, रवींद्र भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले एकतीस वर्षापूर्वी श्री भागेश्वर दुध संस्थेची स्थापना पत्र्याच्या शेड मध्ये करण्यात आली होती. आज संस्थेची स्वमालकीची इमारत, किराणा भांडार, संस्कृतीक भवन, प्रिकुलिंग केंद्र आहे. संस्थेत रोज अडीच हजार लिटर दुध संकलन होते. प्रिकुलिंग करून दुधाची स्थानिक विक्री करून शिल्लक दूध कात्रज संघाला दिले जाते. मागील वर्षभरात संस्थेत ८ लाख ९९ हजार लिटर दुधाचे संकलन झाले. दूध खरेदी विक्रीतुन संस्थेला २२ लाख ८४ हजार रुपयांचा नफा झाला आहे.

आमदार बेनके म्हणाले या दोन्ही संस्थामुळे परिसर विकासाला चालना मिळाली आहे. माजी आमदार वल्लभ बेनके यांनी नेहमी संस्थेला मदत केली आहे.संस्थेच्या अडचणी सोडवण्यासाठी यापुढे देखील मदत करू.सूत्रसंचालन जंगल कोल्हे, सुनिल मेहेर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन राजेंद्र वारुळे, आत्माराम बनकर यांनी केले.

Previous articleजिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांना कलम 36 अन्वये अधिकार प्रदान
Next articleबी.डी.काळे महाविद्यालयात लसीकरण मोहिमेचे आयोजन