वाळू व्यावसायिक संतोष जगताप यांच्यावर गोळीबार, गोळीबारात दोघे ठार

अमोल भोसले,उरुळी कांचन

उरुळी कांचन येथे महामार्गावर भर दुपारी झालेल्या गोळीबारात दौड तालुक्यातील वाळू व्यावसायिकासह आणखी एक जण मृत्यूमुखी पडला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर गोळीबार पुर्ववैमनस्यातून झाला असल्याची माहिती पुढे येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राहू येथे बेकायदा वाळू उपश्यावरुन २०११ मध्ये तत्कालीन दौंड बाजार समितीचे संचालक गणेश सोनवणे व त्यांचे चुलत भाऊ रमेश सोनवणे यांच्यावर भरदिवसा गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप संतोष जगताप याच्यावर आहे. या प्रकरणात जामिनावर संतोष जगताप बाहेर होता. सदर प्रकार आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सोलापूर – पुणे महामार्गावरील हॉटेल सोनई समोर घडला आहे. यामध्ये दहिटणेरोड, चव्हाणवाडी, माधवनगर, राहू ता. दौड येथील वाळू व्यावसायिक संतोष संपतराव जगताप ( वय ३८) व स्वागत बाप्पू खैरे ( वय २५, रा. दत्तवाडी, ऊरूळी कांचन, ता. हवेली ) हे मृत्यूमुखी पडले आहेत. जगताप यांचे दोन अंगरक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांचेवर उपचार सुरू आहेत.

जगताप हे आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सोलापूर – पुणे महामार्गावरील हॉटेल सोनई समोर थांबले होते. अचानक आलेल्या सोनवणे गॅंगच्या चार ते पाच जणांनी जगताप व त्यांच्या अंगरक्षकावर घातक हत्याराने हल्ला चढवून गोळीबार केला. यात जगताप व दोन अंगरक्षक गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत जगताप यांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. त्यात खैरे जागीच ठार झाला तर उर्वरित पळून जाण्यात यशस्वी ठरले.

जगताप, खैरे व जखमींना लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता संतोष जगताप यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. तर खैरे उपचार सुरू असताना मयत झाले आहेत. जगताप यांचे नातलग व मित्र हॉस्पिटलमध्ये जमा झाल्याने तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. पोलीसांची कुमक वाढवल्याने हॉस्पिटल परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास चालू आहे.

Previous articleसोरतापवाडी येथे महिला किसान दिन साजरा
Next articleनारायणगाव येथील साई मंदिरातील दान पेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली