नारायणगाव मध्ये लाला अर्बन बँकेच्या बाजारपेठेतील शाखेच्या नूतन स्वमालकीच्या वास्तूचे उद्घाटन

नारायणगाव,किरण वाजगे

 येथील लाला अर्बन बँकेच्या बाजारपेठेेतील शाखेचे नवीन स्वमालकीच्या इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधरजी अनास्कर यांच्या हस्ते व पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुभाष मोहिते, सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
यावेळी सन २०२० चा माजी खासदार स्व. किसनराव बाणखेले सहकार भूषण पुरस्कार विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष जगनशेठ कवडे व सन २०२१ चा सहकार भूषण पुरस्कार महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधरजी अनास्कर यांना पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर, मंचरचे उपसरपंच युवराज बाणखेले संस्थेचे अध्यक्ष ॲड. निवृत्ती काळे, उपाध्यक्ष नितीन लोणारी, संचालक श्रीमती. मथुरानानी बाणखेले, जगदीश फुलसुंदर, अशोक गांधी, विमल थोरात, सचिन कांकरिया, नारायण गाढवे, डॉ.जैनुद्दीन मुल्ला, दीपक खैरे ,मंगेश बाणखेले , जे के थोरात ,अरुण लोंढे , बाळासाहेब बाणखेले , बबन साकोरे ह.भ.प. गणेश महाराज वाघमारे, रामदास बाणखेले , विजय गुंजाळ ,विलास वाजगे ,संजय अडसरे ,किशॊर पोखरना , बाळासाहेब महाले , मिलिंद कवडे, ॲड‌. शिवदास तांबे ,संपत शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डी.एन. सुरम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप मोरे, शाखाधिकारी सचिन गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात अशोक गांधी यांनी संस्थेच्या ठेवी ३५० कोटी, कर्ज वाटप १९० कोटी, स्वनिधी ३३ कोटी, थकबाकी २.८९ टक्के, नफा २ कोटी ५१ लाख झाला आहे. संस्थेला ऑडिट अ वर्ग प्राप्त झाला असून संस्थेचे मुख्य कार्यालय नारायणगाव सह आळेफाटा, नारायणगाव हायवे, बाजारपेठ नारायणगाव, राजगुरुनगर, व भोसरी या सहा शाखा स्वमालकीच्या वास्तूत असल्याचे नमूद केले.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्याधरजी अनास्कर यांनी पुरस्काराचे स्वरूप कसे आहे यापेक्षा भावना महत्त्वाच्या असल्याचे सांगितले.

अण्णांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराबद्दल मला मनस्वी आनंद झाला असून त्यांचे व माझे खूप स्नेहाचे संबंध होते. त्यामुळे या पुरस्काराचा मी सहकार मित्र म्हणून स्वीकार करीत आहे. रिझर्व बँकेच्या कुठल्याही निर्णयाला घाबरून न जाता रिझर्व बँकेने घालून दिलेल्या कडक नियमांचा सामना करण्याची क्षमता प्रत्येक सहकारी बँकेत असली पाहिजे. रिझर्व बँकेने जी नियमावली तयार केली आहे ती कुठल्याही बँकेला तंतोतंत अमलात आणणे शक्य नाही त्यामुळे प्रत्येक बँकेला दंड हा होणारच. त्यामुळे बँकांनी संचालक, कर्मचारी, सभासद, ठेवीदार यांना प्रशिक्षण देणे काळाची गरज आहे.

वर्तमानपत्रात बँकांच्या बाबत एखादी बातमी छापून आली तर ठेवीदार गंभीर होऊन घाबरून बँकांसमोर पैसे काढून घेण्यासाठी मोठी गर्दी करतात त्यामुळे बँका लवकर डबघाईस येतात. आजही सहकारी बँकांचे अर्थ जाळं मोठं आहे. पतसंस्थांची निर्मिती लहान ठेवीदार व कर्जदारांसाठी असल्यामुळे त्यांनी त्यांच्यापुरते मर्यादित कर्जवाटप करावे. मोठ्या कर्ज वाटपासाठी मोठ्या बँकां आहे. त्यामुळे पतसंस्थांनी तळागाळातल्या लोकांसाठी काम केले पाहिजे. सहकार क्षेत्र शाश्वत व चांगलं आहे त्यामुळे ते टिकणारच आहे. पूर्वी बँका वाड्या-वस्त्यांवर गेल्या पाहिजे असे सरकारचे धोरण होते परंतु २००४ नंतर धोरण बदलले आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार कमी परंतु मोठ्या बँका असल्या पाहिजे त्यामुळे पुढील काळात प्रत्येक बँकेने बदलत्या काळाचा स्वीकार केला पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश जाधव, शरद मिसाळ यांनी केले,तर आभार सचिन कांकरिया यांनी मानले.

Previous articleमनसेच्या स्टिंग ऑपरेशनमुळे रेशन दुकानदारांची उडाली भंबेरी
Next articleदौंडमध्ये इंडीपेंडट इंग्लिश स्कुल असोसिएशनची स्थापना