तमाशा फडमालकांना विरोबा पतसंस्थेच्या वतीने आर्थिक मदत

नारायणगाव,किरण वाजगे

कोरोनाविषाणू च्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षात दोन सिझन बंद असलेल्या लोकनाट्य तमाशा मंडळाच्या फड मालकांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने नारायणगाव (ता. जुन्नर) येथील विरोबा पतसंस्थेच्या वतीने सात तमाशा फड मालकांना प्रत्येकी ५१ हजार रुपये मदत देण्यात आली.


श्री मुक्ताई मंदिरात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात आमदार अतुल बेनके विरोबा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पाटे, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांच्या हस्ते आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले.

याप्रसंगी विठाबाई नारायणगावकर, रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर, तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर, मंगला बनसोडे करवडीकर, मालती इनामदार नारायणगावकर, भिका भीमा सांगवीकर, चंद्रकांत ढवळपुरीकर या तमाशा फडमालकांना आर्थिक मदत देण्यात आली.

या कार्यक्रमास मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ शेटे, डी.के. भुजबळ, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, सरपंच योगेश पाटे, विघ्नहर चे संचालक संतोष खैरे, सुजित खैरे, विरोबा पतसंस्थेचे सचिव राजेंद्र पाटे, उपाध्यक्ष राजेंद्र बोरा, अजिंक्यतारा पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश वाजगे, रोहिदास भुजबळ, तमाशा फडमालक नितिन बनसोडे, मालती इनामदार, अविष्कार मुळे, मोहित नारायणगावकर, गणेश सांगवीकर उपस्थित होते.

यावेळी फडमालक मालती इनामदार व नितिन बनसोडे म्हणाले की, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तमाशा साहित्याची रंगरंगोटी करून व साहित्याचे पूजन करून राज्यातील फडमालक तंबूचे तमाशा करण्यासाठी राज्याचा दौरा करतात. मात्र राज्य शासनाने यात्रा-जत्रा ना अद्याप परवानगी दिली नाही त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर दौरा करणे फड मालकांना सलग दुसऱ्या वर्षी जमले नाही. शासनाने यात्रा जत्रा व सांस्कृतिक कार्यक्रमांना विनाअट परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी किरण ढवळपुरीकर व कैलास नारायणगावकर यांनी केली.

विरोबा पतसंस्थेने केलेल्या मदतीने आम्हाला खरोखर दिलासा मिळाला अशी भावना अविष्कार मुळे, गणेश – राजेश सांगवीकर, अमर खेडकर यांनी व्यक्त केली.

Previous articleप्रशांत पवार यांची शिरुर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड
Next articleदौंड मध्ये शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश