पत्रकारांच्या आंदोलनाचा दणका;बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात राष्ट्रीयकृत बँकेच्या दोन नव्या शाखा सुरू होणार

गणेश सातव

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी एखादा विषय हाती घेतला की, त्यात यश येतेचं येते याचा अनुभव आता पुन्हा एकदा आला आहे.वडवणी आणि देवडी येथे राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करावी या मागणीसाठी एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली वडवणी येथील पत्रकारांनी उपोषण आंदोलन केले होते.ते यशस्वी होत असून दोन्ही ठिकाणी बँक सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया या बीडच्या लिड बँकेने वडवणीच्या तहसिलदारांना तातडीने फोन करून बँकेचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली होती. त्यानुसार तहसिलदारांनी तातडीने बँकेकडे प्रस्ताव पाठविला असून तालुक्यात बँकेच्या दोन शाखा सुरू करण्याची विनंती केली आहे.

तत्पुर्वी एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वडवणी शाखेच्या वतीने सर्व पत्रकारांनी तहसिल कार्यालया समोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. त्यानंतर एस.एम.देशमुख यांनी केंद्रिय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्याशी संपर्क साधून त्यांना वडवणी तालुक्यात बँकेच्या शाखा सुरू करण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडेही निवेदने पाठविण्यात आली होती.त्याची शासकीय पातळीवर तातडीने दखल घेण्यात आली असून तालुक्यात दोन बँका सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केला आनंद

तालुक्यात दोन नवीन बँका सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची बातमी समजताच एस.एम.देशमुख यांनी आनंद व्यक्त केला आहे.दोन शाखा सुरू झाल्यास जनतेची गैरसोय होणार नाही. सामान्यांचा वेळ आणि पैसा वाचेल आणि तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

पत्रकारांच्या आंदोलनाची सरकारने तातडीने दखल घेत कार्यवाही सुरू केल्याबद्दल देशमुख यांनी सरकारला धन्यवाद दिले आहे. तसेच पत्रकारांच्या मागणी पाठिंबा दिल्याबद्दल तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांना देखील एस.एम.देशमुख, संपादक अनिल वाघमारे,वडवणीचे अध्यक्ष विनायक जाधव यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे धन्यवाद व्यक्त केले आहे.

Previous articleसराफी दुकानात चोरी करणाऱ्या चौघांना शिताफीने अटक
Next articleपत्रकारांच्या आंदोलनाचा दणका;बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात राष्ट्रीयकृत बँकेच्या दोन नव्या शाखा सुरू होणार