शाळा-काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी एसटी बसचे पास काढून घ्यावेत; राजगुरुनगर आगारप्रमुख शिवकन्या थोरात यांचे आवाहन

राजगुरूनगर- शाळा आणि महाविद्यालये सुरु झाल्याने विद्यार्थ्यांनी सवलतीच्या दरातील सुरक्षित प्रवासासाठी एसटी बसचे पास काढून घेण्याचे आवाहन राजगुरुनगर आगारप्रमुख शिवकन्या थोरात यांनी केले आहे.

अगदी कमी अंतराचा प्रवास असो अथवा दूरचा, सदर विद्यार्थ्यांना एसटी ने पास देण्याची व्यवस्था केली आहे. शाळा-महाविद्यालयांत शिक्षण घेत असल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट आणि पासपोर्ट साईजचे फोटो घेऊन येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याला पास दिला जाईल. ग्रामीण भागातून प्रवासखर्च करुन राजगुरुनगरला फक्त पास काढण्यासाठी विद्यार्थ्याचा वेळ आणि पैसा खर्च होऊ नये यासाठी जर तेथील शाळा – काॅलेजांनी विद्यार्थ्यांचे एकत्रित पास काढण्यासाठी कॅम्प आयोजित करण्याची तयारी दर्शविली तर राजगुरुनगर आगारातील संबंधित कर्मचारी त्या शाळा काॅलेजात येवून विद्यार्थ्यांचा राजगुरुनगरचा हेलपाटा वाचविण्यासाठी सहकार्य करेल, सबंधित विद्यालयात येवून पास देण्याची व्यवस्था केली जाईल अशी माहिती आगारप्रमुख शिवकन्या थोरात, वाहतूक निरिक्षक तुकाराम पवळे, नियंत्रक नागेश्वर वैरागर, दिलीप तापकिर यांनी सांगितली.

शाळा-महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या सामूहिक पास कॅम्पसंदर्भात अधिक माहितीसाठी वाहतूक नियंत्रक नागेश्वर वैरागर (९१४६०८४९०९) यांचेशी संपर्क साधू शकता असे आवाहन राजगुरुनगर आगारप्रमुखांनी केले आहे.

Previous articleवीज कंत्राटी कामगारांचे आंदोलन
Next articleवीज कंत्राटी कामगारांचे आंदोलन