पहिण्याच्या नवरा सुळक्याहून नव दुर्गांना नमन: साहसी मोहीम स्त्री जन्मास समर्पित

 

राजगुरूनगर- सह्याद्री खोऱ्यात आरोहणासाठी कठीण श्रेणीत गणला जाणारा २६० फूट उंची असलेला पहिणे नवरा सुळका टीम पॉईंट ब्रेक ऍडव्हेंचर्सच्या मार्गदर्शनाखाली सर करीत गिर्यारोहकांनी नव दुर्गांना नमन करीत, स्त्री शक्तीचा जागर करीत अभिमानाने तिरंगा फडकावित, केलेली ही साहसी मोहीम स्त्री जन्मास समर्पित केली.

या मोहीमेची सुरवात लक्ष्मणपाडा (पहिणे गाव, ता.त्र्यंबकेश्वर, जि.नाशिक) येथून झाली. सुरवातीचा टप्पा शेता लगत असणाऱ्या बांधाने जात एक छोटा ओढा पार करावा लागतो. येथूनच घनदाट जंगलातील खड्या चढाईचा मार्ग नवरा नवरी सूळक्याच्या पायथ्याला घेऊन जातो.

सुळका आरोहणासाठी सुमारे एक तास लागतो. खडकांच्या खाचांमध्ये हातांच्या आणि पायांच्या बोटांची मजबूत पकड करून चिकाटीने आरोहण करावे लागते. अंगावर येणारा खडक हा गिर्यारोहकांची मानसिक आणि शारीरिक कसोटी पाहणारा आहे. सुळक्याचा खडक काही ठिकाणी सैल व निसरडा असल्यामुळे जपून पाऊल टाकावे लागते.

पहिला ४० फूटी टप्पा पार केल्यावर अंगावर येणारा १० फूटी टप्पा पार करीत तोल सांभालून पुढचा १५ फूटी टप्पा गिर्यारोहकांची परीक्षा घेणारा आहे. येथून थोडे आडवे गेल्यावर १५ फूटी टप्पा पार करताना ठिसुळ खडक असल्याने पाऊल जपून टाकावे लागते. येथून शेवटचा अवघड असा अंगावर येणारा १० फूटी खडकाळ टप्पा पार करून शिखर सर करता येते.

शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारा आणि काळजाचे ठोके चूकवणारा सुळक्याचा खडतर निसारडा मार्ग आणि बाजूलाच असलेली खोल दरी, मुसळधार पाउस, हूडहूडी भरावणारी थंडी, शेवाळलेले खडक, ओले कातळकडे, एक चुकीचे पाऊल आणि खोल दरीतच विश्रांती असल्याने चुकीला माफी नाही असे हे ठिकाण, अश्या सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉईंट ब्रेक ऍडव्हेंचर्सच्या मार्गदर्शनाखाली रोहित जाधव, डॉ.समीर भिसे, शिवाजी जाधव, अथर्व शेटे, प्रमोद अहिरे, राहुल भालेकर, प्रशांत कुदळे, कमलसिंग क्षत्रिय, सुमेश क्षत्रिय, कविता बोटले, ज्योती राक्षे-आवारी, वर्षा अष्टमवार, माधुरी पवार, वंदना कुलकर्णी, डॉ.प्रियंका हिंगमीरे, सुदर्शन हिंगमीरे, उमेश कातकडे, समीर देवरे या गिर्यारोहकांनी मोहीम फत्ते केली.

Previous articleखालुब्रे गावातील ग्रामस्थांचा समाजासमोर नवा आदर्श
Next articleवीज कंत्राटी कामगारांचे आंदोलन