यशवंतचे धुराडे पुन्हा पेटणार : आमदार अशोक पवार

अमोल भोसले,उरुळी कांचन

आर्थिक अनियमिततेमुळे गेल्या दहा वर्षांपासून बंद असलेल्या थेऊर ( ता हवेली ) येथील यशवंत कारखान्यावर सध्या असलेल्या अवसायकास हटवून प्रशासकीय मंडळ नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे यशवंत पुन्हा पुर्ववैभवात सुरू होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.

गेल्या १० वर्षाच्या कालावधीत अनेक राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधींनी आम्ही यशवंत सुरू करणारच अश्या भिमगर्जना केल्या होत्या. परंतू राज्य सहकारी बँकेच्या धोरणामुळे कारखाना आजअखेर सुरू होऊ शकला नाही. कर्जाबाबत एकरकमी परफेड योजना अमलांत आणून त्यातून यशवंतला बाहेर काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत साखर आयुक्तालयातील अधिका-यांना निर्देश दिले आहेत. शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

शुक्रवारी पवार यांचे उपस्थितीत विभागीय आयुक्तालयात यासंदर्भात बैठक घेतली.

यावेळी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, राज्य सहकारी परिषदेचे उपाध्यक्ष विद्याधर अनास्कर, साखर आयुक्त शेखर गायकवाड, पुणे प्रादेशिक सहसंचालक धनंजय डोईफोडे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, प्रकाश म्हस्के, सुरेश घुले, तात्यासाहेब काळे, माधव काळभोर, विकास लवांडे उपस्थित होते.

यासंदर्भात सविस्तर माहिती देताना आमदार अशोक पवार म्हणाले की, “कारखान्यावर सध्या अवसायक नेमेले आहेत. त्याऐवजी ठोस निर्णय घेण्यासाठी प्रशासकीय मंडळ नेमावे असे या बैठकीत ठरले आहे. सहकार विभाग आणि साखर आयुक्तालय त्यादृष्टीने कार्यवाही करणार आहे. कारखान्यावर असलेली अन्य बॅंकांची कर्जे राज्य सहकारी बॅंकेने स्विकारून त्यांच्यासोबत कमीत कमी रकमेत तडजोड करून कारखान्याला एकरकमी कर्ज परतफेड योजनेत सहभागी करून घ्यावे. कारखान्यावरील एकूण कर्जाची माहिती घेऊन ते परतफेड करण्यासाठी आवश्यक तेवढी जमीन पीएमआरडीए, म्हाडा, मार्केट कमिटी सारख्या शासकीय संस्थांना विकावी व कामगार, शेतक-यांच्या थकबाकी द्यावी. त्यानंतर याच ठिकाणी नवीन कारखान्याची उभारणी करून कमी गाळपक्षमतेचा परंतू अधिक इथेनॉल निर्मिती करणा-या प्रकल्पाची उभारणी करावी. यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सल्ला घ्यावा असें ठरले आहे. यामुळे यशवंतचे धुराडे पुन्हा पेटणार अशी आशा निर्माण झाली आहे.

Previous articleमहसूल विभागाच्या वतीने विविध दाखल्यांचे खासदार डॉ.अमोल कोल्हें यांच्या हस्ते वाटप
Next articleफुलगाव येथील हरी उद्धव धोत्रे माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी