गावठी पिस्तूलासह दोघे जेरबंद

नारायणगाव ,किरण वाजगे

एका गावठी पिस्तुलासह दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळाले आहे.

वडगाव मावळ परिसरात गस्त घालत असताना साहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे व त्यांच्या पथकाला गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाल्यानंतर पुणे मुंबई हायवे वर माळीनगर कडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर दोन जण संशयित रित्या फिरताना दिसले. या माहितीनुसार त्या दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे मदन तुळशीराम वारंगे (वय ३१, रा. माळीनगर वडगाव मावळ, जिल्हा पुणे) व सागर दिलीप भिलारे, (रा. भिलारे वाडी, वडगाव मावळ जिल्हा पुणे) अशी सांगितली. दरम्यान त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याच गोष्टीचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, मदन तुळशीराम वारंगे याच्या कमरेला एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे व इतर माल असा एकूण ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. यातील मदत तुळशीराम वारंगे याच्यावर वडगाव पोलीस स्टेशन येथे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. या दोघांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी वडगाव मावळ पोलिसांच्या ताब्यात त्यांना देण्यात आले आहे.

ही यशस्वी कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस हवालदार दिपक साबळे, विक्रम तापकीर, मुकुंद आयाचीत, संदीप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, प्रसन्न घाडगे, प्राण येवले, सहाय्यक पोलीस फौजदार मुकुंद कदम व पोलीस मित्र प्रसाद पिंगळे यांनी यशस्वीरित्या केली.

Previous articleआमदार अशोक पवार यांच्या हस्ते शेतकरी मासिकांचे वाटप 
Next articleनारायणगाव महाविद्यालयात गांधी जयंती व शास्त्री जयंती निमित्त व्याख्यान