राजगुरुनगर-वाकळवाडी एसटी बस सुरु करण्याची मागणी

राजगुरुनगर- वाकळवाडी एसटी  सेवा पुर्ववत सुरु करण्याची मागणी वाकळवाडी ग्रामपंचायतीच्या युवा सदस्या कु.शिवराज्ञी पवळे यांनी केली आहे. त्या आशयाचे निवेदन राजगुरुनगर आगारप्रमुख शिवकन्या थोरात यांना दिले आहे.

वाकळवाडी हे गाव मुख्य रहदारीच्या रस्त्यांपासून तीन-चार किमी दूर डोंगरावर आहे. एसटी बस बंद असल्याने येथून राजगुरुनगरला येणारे महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, रोजचे चाकरमाने व नागरिकांची गैरसोय होत आहे. शिवाय दुपारी राजगुरुनगरहून येणार्‍या महिला व युवतींना गुळाणीहून उन्हातान्हात निर्जन डोंगरातून येताना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे तुर्तास दुपारची एसटी बस तातडीने सुरु करुन राजगुरुनगर-वाकळवाडी एसटी बसच्या सकाळ, दुपार, संध्याकाळ फेर्‍या पुर्ववत सुरु करण्याची मागणी शिवराज्ञी पवळे यांनी निवेदनात केली आहे.

यावेळी आगारप्रमुख शिवकन्या थोरात, वाहतूक निरिक्षक तुकाराम पवळे, वाहतूक नियंत्रक नागेश्वर वैरागर, खेड तालुका शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष धर्मराज पवळे उपस्थित होते.

लवकरच राजगुरुनगर-वाकळवाडी एसटी बस सेवा सुरु करु अशी ग्वाही आगारप्रमुख शिवकन्या थोरात यांनी दिली.

Previous articleप्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण वर्ग संपन्न
Next articleडंकन कंपनीतील कामगारांच्या पगारवाढीच्या करारनाम्यावर शिक्कामोर्तब