राजगुरुनगरच्या गिर्यारोहकांनी मलंग गडावर फडकवला तिरंगा

राजगुरुनगर- सह्याद्री खोऱ्यात आरोहणासाठी आव्हानात्मक मानला जाणारा श्री मलंगगडाचा बालेकिल्ला टीम फोर्ट ऍडव्हेंचर आणि मावळे माउंटेन रेंजर्स यांनीं सर केला.

या मोहिमेसाठी आम्ही रात्री 10 पुण्यावरून निघालो,पहाटे 3:०० वाजता गडाच्या पायथ्याशी मलंगवाडी, ता.बदलापुर, जि.ठाणे येथे पोहचलो. चंद्राच्या शीतल प्रकाशात गडाची किनार स्पष्ट दिसत होती,बाजूला घनदाट जंगल जाणवत होते, झऱ्याच्या पाण्याचा खळखळाट रात्रीची शांतता भंग करीत होता. अश्या निसर्गाच्या सान्निध्यात पायथ्याला टेंट मध्ये मुक्काम केला. पहाट केव्हा होते, उद्याची सफर कशी राहील, या विचारात झऱ्याचा स्वर कानात घेत शांत झोप लागली.


मलंगगड कल्याणपासून दक्षिणेस १६ कि.मी. अंतरावर व माथेरान या डोंगर रांगेत आहे. करंजा व उरण नैर्ऋत्येस आणि बोरघाट, भीमाशंकर व माळशेज घाट पूर्वेस असा हा भाग एकेकाळी लढाईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता. मलंगगड हे धार्मिक स्थान श्री मच्छिंद्रनाथ या नावाने ओळखले जाते. मलंगगड हा किल्ला शिलाहार राजाने बांधला. येथे मच्छिंद्रनाथांचे पुरातन मंदिर आहे याच मंदिरात मच्छिंद्रनाथ यांची समाधी आहे. येथील मलंग मच्छिंद्रनाथ समाधीची यात्रा माघ पौर्णिमेला असते. श्री मलंग गडावर नाथपंथाची दीक्षा गादी आहे. या मुख्य स्थानापासून अलीकडे दोन समाधी आहेत, त्या जालिंदरनाथ आणि कानिफनाथ यांच्या आहेत. तर याच गडावर नाथपंथाचे श्री मच्छिन्द्रनाथ आणि गोरक्षनाथ यांचे मंदिर आहे, तसेच अन्य ५ नाथांची समाधीही आहे.


पहाटे चार वाजता आयोजक टीम नाष्टा करण्याच्या तयारीला लागली, तेव्हा जाग आली. सर्वजण उठून फ्रेश झालोत, तांबडे फुटले होते, त्यात आता सभोवतालचा परिसर नजरेस पडत होता. गरमागरम नाष्टा, चहा घेतला. त्यानंतर विविध ठिकाणाहून आलेल्या सर्वांनी आपापला परिचय करून दिला. मावळे माउंटन रेंजर्स चे चेतन, दर्शन आणि फोर्ट एडव्हेंचर चे अक्षय भोगाडे आणि सचिन पुरी यांनी मोहिमेत घ्यावयाची खबरदारी व एकूणच मोहिमे संदर्भात थोडक्यात माहिती दिली, आणि ४५ जणांनी भटकंतीस सुरुवात केली.

गडाचा डोंगर इंग्रजी C आकाराचा आहे, आम्ही चढाई एका टोकाला करून उतरताना दुसऱ्या टोकाला येणार होतो, त्यामुळे सर्व गड भटकायला मिळणार होता. खालून गडाचा आवाका कमी वाटत होता, परंतु जसजसे आम्ही वर जात होतो तस तसे आमची दमछाक होऊन गड भव्य दिव्य भासत होता.


पाचपीर मार्गे पीरमाची गाठत पुढे खड्या चढाईच्या मार्गाने सोन माची येथे येऊन पोहोचलो, येथे येताना कातळात अगदीच लहान लहान पायऱ्यांवरून जावे लागले. येथून पुढे उजव्या बाजूला उभा कातळखडक आणि डाव्या बाजूला खोल दरी अश्या मार्गाने पुढे गेल्यावर खडकात कोरलेल्या पायऱ्यांच्या वाटेनं ७० फूट वर गेल्यावर हा मार्गच नाहीसा होतो. इंग्रजांनी सुरुंग लावून येथील बऱ्याच पायऱ्या उध्वस्त केल्या आहेत. त्यामुळे पुढे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. या ठिकाणी १५ फूटी पोल क्रॉसिंगचा थरार अनुभवत मार्ग काढावा लागतो. ओल्या निसरड्या पोलवर पायांची मजबूत पकड करून रस्सीच्या आणि खडकाळ भिंतीच्या सहाय्याने तोल सांभाळत सावधानतेने एक एक पाऊल टाकावे लागते. (इथे पोहचल्यावर इश्क चित्रपटातील एक प्रसंग आठवला अजय देवगण दोन इमारतीमधील पाईप वर लटकलेला असतो आणि अमीर खान त्याला वाचवण्यासाठी दोन पोलवर पुढे सरकताना राम राम म्हणता म्हणता घाबरगुंडी मुळे मरा मरा मरा म्हणायला लागतो.) पोल क्रॉसिंग करून पुढे गेल्यानंतर पाय खरोखर लट लट करतात.

पुढे पायरी मार्गाने वर गेल्यावर साखळदंड मार्ग चिकाटीने हातांच्या आणि पायांच्या बोटांची मजबूत पकड करून साखळीच्या सहाय्याने आरोहण करावे लागते. पुढे दोन्ही बाजूला दरी आणि छोट्या निसरड्या वाटेने मार्ग काढत छोटा राजवाडा आणि पाण्याचे टाके असलेला गड माथा गाठला. उंचावरून दिसणारा नजारा अप्रतिम होता. खाली सगळीकडे प्रचंड धुके पसरले होते, त्यामुळे आपण ढगांच्या वर असल्याचा भास होत होता. गडमाथ्यावरून माथेरानची लांबलचक डोंगररांग त्यातील ताहुली, चंदेरी गड स्पष्ट दिसत होते. सर्वांनी तिरंगा फडकावून शहिदांना श्रद्धांजली वाहिली. आजची मोहीम जागतिक कन्या दिनाला समर्पित केली.

पाण्याचे टाके पाहत असताना माकडांचा एक मोठा समुह आमच्या चहूबाजूने आक्रमक पवित्रा घेत होता, आमच्या जवळील असणारी शिदोरी त्यांना खायला देऊन आम्ही आमची सुटका करून घेतली. गड उतार होताना पोल क्रॉसिंग जवळून आम्ही rappelling करत १०० फूट खाली उतरलो. उतरण्याच्या ठिकाणाजवळ १५०० फूट खोल दरी होती, त्यात घनदाट जंगल, चोहीकडे धुके त्यामुळे वेगळाच रोमांच अनुभवण्यास मिळाला, आणि याच साठी केला होता अट्टाहास असे वाटले. शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारा आणि काळजाचा थरकाप उडवणारा पोल क्रॉसिंग आणि साखळदंड मार्ग, शेवाळलेले खडक, ओले कातळकडे, धुक्यात हरवलेला परिसर, निसरड्या पायऱ्या आणि एका बाजुला खोल दरी, घनदाट जंगल अशी अनेक आव्हाने या मोहिमेत होती.

गड उतार होताना दिसणारा सूर्यास्त नजारा थकवा दूर करण्यासाठी मदत करीत होता. सायंकाळी ७:३० वाजता आम्ही पायथ्याला येऊन पोहोचलो, तेरा तासांची प्रदीर्घ गड भटकंती करून आत्ता पर्यंतचा माझा सर्वात कठीण,थरारक ट्रेक अखेर सर्व आव्हानांना सामोरे जात टीम मावळे माउंटन रेंजर्स राहुल, दर्शन, चेतन, अमोल यांच्यासोबत फोर्ट एडव्हेंचर चे अक्षय भोगाडे, अजित आरुडे सर, अशोक कोरडे सर , दीपक साळुंके, विशाल , अमर माने, भाग्येश जाधव, दिप्ती येंधे, उषा होले , ऐश्वर्या लगड, सचिन पुरी (Youtuber), संदिप सर राऊत ,वैभव गोरे, सुहास पाटील ,तात्या गायकवाड, शीतल, ज्ञानदा शेटे, शुभांगी कोळगे, आकाश नलावडे, रवी कुंभार, अभिनव (12) आदित्य (12), आराध्या (9) सार्थक येंधे असे 24 जणांनी अभिमानाने मोहीम फत्ते केली.

शब्दांकन- अक्षय भोगाडे

Previous articleकौतुकास्पद!भोसे गावचे उपसरपंच दिगंबर लोणारी यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून राबवला स्तुत्य उपक्रम
Next articleमोफत लसीकरण शिबिरास नागरिकांचा विक्रमी प्रतिसाद