संसदरत्न खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरुर लोकसभा मतदारसंघातील 5 लाख नागरिकांसाठी मोफत लसीकरण

अमोल भोसले

चाकण – खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून’जगदंब प्रतिष्ठान’ने शिरूर लोकसभा मतदारसंघात ५ लाख नागरिकांचे लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतली असून आमदार श्री. दिलीप मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते पहिल्या टप्प्यात खेड तालुक्यातील ५० हजार नागरिकांचे लसीकरण करुन या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे.

गतवर्षी पासून सुरू झालेल्या संकटावर मात करण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण व्हावे यासाठी ‘जगदंब प्रतिष्ठान’ने पुढाकार घेतला असून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर-हवेली, भोसरी व हडपसर या सहाही विधानसभा क्षेत्रात लसीकरणाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे.

सीरम इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने ‘जगदंब प्रतिष्ठान’ने या लसीकरण मोहिमेसाठी ५ लाख लसीच्या मात्रा उपलब्ध करून दिल्या असून नोबल हॉस्पिटल व पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व अधिकृत केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन चाकण ग्रामीण रुग्णालय येथे आमदार श्री. दिलीप मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते व जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

खासदार डॉ. कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर लोकसभा मतदारसंघात सुमारे पाच लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचा संकल्प ‘जगदंब प्रतिष्ठान’ने सोडला असून सुरुवातीला टप्प्याटप्प्याने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ५० हजार आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित लसीच्या मात्रा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सामाजिक बांधिलकी म्हणून राबविण्यात येत असलेल्या या लसीकरण कार्यक्रमात शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी सहभागी होऊन जास्तीतजास्त लसीकरण करून घ्यावे असे आवाहन ‘जगदंब प्रतिष्ठान’च्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleचोरीला गेलेले सोन्याचे दागिने फिर्यादी महीलेस परत
Next articleदुचाकी चोरी होऊ नये म्हणून करा “हा” सर्वात स्वस्त उपाय