नारायणगाव ग्रामपंचायतीच्या कचरा गाडीत आढळला माणसाचा पाय

किरण वाजगे,नारायणगाव

येथील एसटी बस स्थानकाजवळील मोठ्या हॉस्पिटलमध्ये एका ज्येष्ठ नागरिकावर शस्त्रक्रिया केल्यानंतर काढून टाकलेला पाय बुधवार दिनांक २२ रोजी सकाळी ग्रामपंचायतच्या कचरा गाडीमध्ये आढळून आला आहे.
याबाबत परिसरातील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात आला आहे.

आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेला व शस्त्रक्रिया करून काढलेला मानवी पाय म्हणजेच जैविक कचरा बेकायदेशीरपणे सार्वजनिक ठिकाणी फेकून देणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी बजरंग दलाचे माजी जिल्हा संयोजक नामदेव खैरे यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील एका रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा शस्त्रक्रिया करून पाय काढण्यात आला होता. हा पाय नारायणगाव ग्रामपंचायतच्या कचरा गाडीत सफाई कर्मचाऱ्यांना आढळला. याबाबत नारायणगाव पोलिस स्थानकात माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

याबाबत पोलीस निरीक्षक देशपांडे म्हणाले की, बस स्थानकाजवळील एका हॉस्पिटलमध्ये ८१ वर्षिय ज्येष्ठ नागरिकाला उपचारासाठी दाखल केले होते. त्याच्या पायाला गॅंगरीन झाल्यामुळे शस्त्रक्रिया करून त्या व्यक्तीचा घोट्यासह थोडा वर असलेला पाय काढून टाकण्यात आला. हा पाय कचरा गाडीमध्ये टाकण्यात आला. सकाळी १०.३० च्या सुमारास वारूळवाडी कचरा डेपो मध्ये हा पाय आढळला असता या घटनेचा पंचनामा केला आहे. अशाप्रकारे जैविक कचरा अथवा मानवी अवयव सार्वजनिक ठिकाणी टाकून देणे बेकायदेशीर आहे . याबाबत चौकशी सुरू असून प्राथमिक चौकशीत नर्सच्या हलगर्जीपणामुळे हा पाय चुकून कचऱ्याच्या गोणीत टाकला गेला असल्याचा खुलासा डॉक्टरांनी केला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून दोषी डॉक्टरांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करू असे आश्वासन पोलीस निरीक्षक देशपांडे यांनी दिले.

दरम्यान या घटनेमुळे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या अनेक डॉक्टरांच्या कोविड कालावधीमधील छोट्या मोठ्या चुका, अर्थात रुग्णांकडून अधिकचे बिल घेणे, विनाकारण महागडी इंजेक्शन देणे, योग्य उपचार न करणे, आदी गोष्टींच्या चर्चा सर्वसामान्य नागरिक करताना दिसत आहेत.

Previous articleपुणे जिल्ह्रात रक्तदानात खेड तालुक्याचा विक्रम ; रक्तदात्यांनी तालुक्याचा वाढवला मान !
Next articleअशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली पेरणे वाडेबोल्हाई जिल्हा परिषद गटात कार्यकर्ता आपल्या दारी उपक्रम