आरोग्य विभागातील परीक्षा पारदर्शक पद्धतीने होणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे 

 

 

अमोल भोसले,पुणे

 

राज्यात आरोग्य विभागात 25 आणि 26 तारखेला क आणि ड प्रवर्गाची पदभरती करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज महत्वाचे आवाहन केले. ही पदभरती पारदर्शक पद्धतीने होत आहे. मात्र असे असतानाही कुणी जर वशिल्याच्या गोष्टी करीत असेल तर त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असा सावधगिरीचा इशारा आरोग्यमंत्र्यांनी केला आहे. ते आज हिंगोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

 

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करा

 

राज्यात होऊ घातलेल्या आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये कुणी आपल्याकडे वशिला लावून तुमचा नंबर लावतो, असे सांगत असेल आणि तुमच्याकडे पैशाची मागणी करीत असेल तर सावध व्हा. अशा लोकांविरोधात लगेच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करा. आरोग्य विभागातील भरतीअंतर्गत सदर परीक्षा अतिशय पारदर्शक पद्धतीने होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी कुणाच्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. आरोग्य भरतीमध्ये राज्यात काही एजंट पैसे घेऊन वशिल्याने नंबर लावतो म्हणून पैसे उकळण्याचे प्रकार करताहेत. याची कुणकुण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लागली असावी, असे त्यांच्या या आवाहनावरुन स्पष्ट होत आहे.

 

राज्य सरकारच्या आरोग्य विभागात होणारी गट क आणि ड वर्गाची परीक्षा सुरुवातीला 8 आणि 9 सप्टेंबरला होणार होती. एकूण 6 हजार 185 पदांसाठी ही भरती परीक्षा होणार आहे. 25 सप्टेंबरला गट क आणि 26 सप्टेंबरला गट ड संवर्गाची परीक्षा होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, भरतीचे कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीने या प्रक्रियेतील गोंधळ टाळावा, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. याचवेळी परीक्षेचे चोख नियोजन करण्यासाठी राज्य आरोग्य विभागाने कंपनीला सूचना दिल्या आहेत. याचदरम्यान आरोग्यमंत्र्यांनीही सावधगिरीच्या सूचना केल्या आहेत.

 

या पदांसाठी भरती होण्याची शक्यता

 

सामाजिक अधीक्षक (भौतिकशास्त्र),फिजिओथेरपिस्ट, समुपदेशक, व्यावसायिक थेरपिस्ट, ज्युनियर लिपिक, सामाजिक अधीक्षक (वैद्यकीय), प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, नेत्र चिकित्सा अधिकारी, नॉन वैद्यकीय सहाय्यक, सांख्यिकीय अन्वेषक, रासायनिक सहाय्यक, बॅक्टेरियोलॉजिकल असिस्टंट, ज्युनियर अभियंता, मीडिया मेकर, टेलिफोन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, कुशल कारागीर, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, जेआर तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ, फोरमॅन, सेवा अभियंता, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, शिक्षक, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, बालरोग परिचारिका, गृह वस्त्रपाल, लॅब टेक अधिकारी, लॅब वैज्ञानिक अधिकारी, लॅब सहाय्यक, एक्स-रे टेक्निशियन. ब्लड बँक वैज्ञानिक अधिकारी, फार्मासिस्ट अधिकारी, डाएटिशियन, स्टाफ नर्स, ड्रायव्हर, प्लंबर, अभिलेखपाल, ज्युनियर क्लर्क, इलेक्ट्रीशियन, एएनएम, सीनियर क्लार्क, लॅब टेक्निशियन, एक्स-रे तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, फार्मसी अधिकारी, ईसीजी टेक्निशियन, टेलर, रेकॉर्ड कीपर, हाऊस अँड लिनेन कीपर, स्टोअर व लिनन कीपर, एक्स-रे वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, डायलिसिस टेक्निशियन, शिंपी, नलकरगिरी, सुतार, डेंटल हायजीनिस्ट, वॉर्डन, अबलेखापाल, सुतार, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, टेलर, ईसीजी तंत्रज्ञ.

Previous articleआरोग्य विभागातील परीक्षा पारदर्शक पद्धतीने होणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे 
Next articleउंडवडी येथे महालसीकरण शिबिराला उदंड प्रतिसाद