खेड तालुक्यातील किवळे येथे किरकोळ वादातून मित्राचा गळा चिरून खून ; आरोपी २४ तासात जेरबंद

किरण वाजगे,राजगुरूनगर- हॉटेलमध्ये झालेल्या किरकोळ वादातून दोन मित्रांमध्ये झालेला वाद विकोपाला जाऊन आपल्या जवळच्या मित्राचा गळ्यावर धारदार हत्याराने वार करून खून केल्याची घटना शनिवार (दि ११) रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. ही घटना खेड तालुक्यातील पाईट ते शिरोली रस्त्याने मोटरसायकलवर ट्रिपल सीट जात असताना घडली.

या घटनेतील आरोपी २४ तासाच्या आत अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळाले आहे.
याबाबतची फिर्याद मोटरसायकल चालक चंद्रकांत सुदाम शिवले (रा. किवळे ता. खेड) यांनी खेड पोलीस स्थानकात दिली.

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी चंद्रकांत शिवले व त्याचे मित्र रमजान शेख तसेच रफिक शेख हे हॉटेलमध्ये नाश्ता करून पुन्हा पाईट ते शिरोली रस्त्याने जात असताना रमजान शेख व रफिक शेख यांच्यात वाद झाला. या किरकोळ वादातून रफीक शेख याने रमजान शेख च्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करून खून केला असल्याची माहिती फिर्यादी चंद्रकांत शिवले यांनी खेड पोलिसांना दिली.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी खात्रीशीर माहितीच्या आधारे सापळा लावला असता संशयित इसम रफिक उस्मान मुलांनी (वय ३५) हा वडगाव मावळ फाट्यावर येणार असल्याचे खात्रीशीर बातमी गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून वडगाव मावळ फाट्यावर रफिक उस्मान मुलांनी (वय ३५ रा. अहिरे ता. खेड) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्याला खेड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री लंभाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहायक फौजदार प्रकाश वाघमारे, पोलीस हवालदार विक्रम तापकीर, दिपक साबळे, योगेश नागरगोजे, संदीप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर यांनी केली.

Previous articleतरूणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने सावकारावर गुन्हा दाखल
Next articleश्री चक्रधरस्वामी अवतरण दिन अष्टशताब्दी जयंती महोत्सव साजरा