तरूणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने सावकारावर गुन्हा दाखल

चाकण- कर्जाच्या रकमेच्या जादा व्याजदरासाठी वारंवार मानसिक, शारीरिक त्रास देऊन अपहरण करून जबर मारहाण करत तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भोसरीच्या सावकारासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. महाळुंगे इंगळे येथील द्वारका सिटीमध्ये तरुणाने गेल्या शनिवारी राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

धनंजय बाबूराव रेड्डी (वय ३०, सध्या रा. महाळुंगे इंगळे) असे आत्महत्या केलेल्या कर्जदाराचे नाव आहे. त्यांचा भाऊ योगेश बाबूराव रेड्डी (वय ४१, रा. प्राधिकरण, चिखली) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. योगेश यांच्या फिर्यादीवरून सूरज चंद्रकांत गजरे (रा. गुळवेवस्ती, भोसरी) या सावकारासह त्याचा मित्रावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश यांचा भाऊ धनंजय यांने सूरज याच्याकडून काही कर्ज घेतले होते. त्या कर्जाच्या रकमांच्या जादा व्याज दरासाठी सूरज हा त्यांना मानसिक व शारीरिक त्रास देत अपहरण करून मारहाण करत होता. सावकाराकडून नेहमी होत असलेल्या जाचाला कंटाळून आलेल्या नैराश्यातून धनंजय याने राहत्या घरी आत्महत्या केली होती. धनंजय याने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटवरून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

महाळुंगे इंगळे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राम गुळीग याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Previous articleमांजरीच्या सरपंचपदी स्वप्नील उंद्रे
Next articleखेड तालुक्यातील किवळे येथे किरकोळ वादातून मित्राचा गळा चिरून खून ; आरोपी २४ तासात जेरबंद