अष्टविनायक पैकी महत्त्वाच्या असलेल्या ओझरच्या मंदिरात चोरी

नारायणगाव दि. २८ (किरण वाजगे) –

श्री क्षेत्र ओझर (ता. जुन्नर) येथील विघ्नहराच्या मंदिरातुन चोरट्यांनी मंगळवारी (दि. २८) पहाटे दागिने व दानपेटी लांबविल्याची घटना घडली आहे. मंदिराच्या मागील बाजूने आलेल्या चोरट्यांनी पहाटे ३ च्या सुमारास केलेली ही चोरी सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. मंगळवारी सकाळी ही घटना कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली असून उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना, स्थानिक गुन्हे अन्वेषण पुणे ग्रामीणचे पोलीस अधिकारी मांजरे व ओतूर सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे घटनास्थळी दाखल झाले.

अष्टविनायकांपैकी महत्त्वाचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते. मात्र मंदिर बंदीच्या कालावधीत विघ्नहराच्या मंदिरातून चोरट्यांनी सोन्याचा मुलामा दिलेली सुमारे २ किलो वजनाची चांदीची छत्री आणि दानपेटी लांबविली आहे.
दरम्यान लॉकडाऊन कालावधीत बाप्पाचे इतर दागिने लॉकरमध्ये असल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगण्यात येत आहे. चोरट्यांनी ही दानपेटी मंदीराच्या बाहेरील बाजूस टाकून दिल्याचे आढळून आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन चोरटे दिसत असून पोलीस पुढील तपास करीत आहे. या घटनेनंतर पोलीस अधिकारी, देवस्थानचे ट्रस्टी व ग्रामस्थांमध्ये तातडीची बैठक घेण्यात आली असून अधिक माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणी सरपंच अस्मिता गणेश कवडे व ग्रामस्थांनी केली आहे.
या चोरी बाबत देवस्थानचे अध्यक्ष बी व्ही मांडे तसेच गणेश कवडे यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Previous articleजुन्नर तालुक्यात आज सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न
Next articleमागासवर्गियांच्या पदोन्नतीतील आरक्षणाबाबत निर्णायक भूमिका घेण्यासाठी मागासवर्गिय संघटना व तज्ञ व्यक्तीची स्वतंत्र समिती गठित करावी- अरुण गाडे