खरपुडीच्या पंडीत गाडे यांच्या धाडसाचा धर्मराज पवळे यांनी केला सन्मान

राजगुरूनगर- पुणे जिल्ह्यातील खेडच्या खरपुडीत तरसाने एका बाबांवर हल्ला केल्याचा व्हिडीओ आपण सगळ्या व्हाॅट्सअप ग्रुपवर पाहताहोत! तरुणाई तरसाला पाहून धूम ठोकताना, व्हिडीओ काढताना दिसतेय, पण अशा अचानक झालेल्या हल्ल्यात जाधव बाबांचे प्राण वाचवण्यासाठी, प्रसंगावधान राखत पंडीत गाडे बाबांच्याच हातची काठी घेऊन जिवाची पर्वा न करता मर्दमावळ्यासारखे त्या तरसावर तुटून पडले. आणि जाधव बाबांना हिंस्त्र तरसाच्या तावडीतून सोडले. सारे खरपुडीकर सांगतात तिथे पंडीत गाडे नसते तर कदाचित आज जाधव बाबांच्या जिवावर बेतले असते.

अशा पराक्रमी, धाडशी, कर्तबगार व्यक्तिमत्वाचे अभिनंदन व्हावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे, उमलत्या पिढीने, तरुणाईने त्यांचा आदर्श घ्यावा या भावनेतून खेड तालुका शिक्षक संघाचे मा. अध्यक्ष धर्मराज पवळे यांनी खरपुडीत जाऊन त्यांचा सन्मान केला.

यावर पंडीत गाडे म्हणाले, “रस्त्यावर अपघात झाला तर आजची युवा पिढी अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी मोबाईलमध्ये व्हिडीओ काढण्यात गर्क होते, आकस्मित येणार्‍या कोणत्याही प्रसंगामध्ये आपण मदतीला प्रथम प्राधान्य द्यायला हवं!”

खरपुडी खंडोबाचे सुपुत्र, श्री क्षेत्र गुळाणीचे जावईबापू असणार्‍या पंडीत गाडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. शौर्य पुरस्कारासाठी अशा नावांच्या शिफारसी संबंधितांकडून पुढे जायला हव्यात अशा भावना खेड तालुक्यात व्यक्त होत आहेत.

Previous article‘शिक्षक’भावी पिढीचे शिल्पकार-राहूल वांजळे
Next articleचंद्रकांत वारघडे यांचा वृक्षमित्र पुरस्काराने गौरव