मूल्यशिक्षण काळाची गरज- ज्योती दवणे

 

 

अमोल भोसले,पुणे

 

न जायते क्षीणम्, न तू चोरहार्यम।

संस्कारः इह एकमेव धनम् ॥

 

खरंच, या जगामध्ये ‘संस्कार’ही एकच अशी गोष्ट आहे जिचा क्षय होत नाही, संपत नाही आणि कुणी ती चोरून नेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि म्हणूनच शालेय जीवनामध्ये योग्य वयात मिळालेलं सुसंस्कारांचे अमृत सिंचनच मुलांना उद्याचा सशक्त परिपक्व माणूस बनवत असतात. मनुष्याची बुद्धी, हृदय, आत्मा या त्रयीचा विकास म्हणजे शिक्षण. मानवी मूल्यांचे संवर्धन आणि जतन करते ते शिक्षण.माणसालाला ख-या अर्थाने माणूस घडविते तेच खरे शिक्षण.आजच्या आधुनिकतेच्या रणधुमाळीत मात्र नैतिक मूल्ये कुस्करली जात आहेत. जग जवळ आलं पण माणसं, यांत्रिक झाली. दया – माया- सहानुभूती यांना पारखी होत चालली. सर्वदूर होत असलेलं नैतिक अध:पतन, उसवलेले नातेसंबंध दुरावलेले आदर्श घराघरातील पैसाकेंद्री व्यवहार, यशाच्या-सूखाच्या फिल्मी कल्पना , सर्व बाजूंनी होणारा रंजनाचा मारा, प्रसारमाध्यमातून घरात थेटपणे भिडणारा पाश्चात्य संस्कृतीचा प्रवाह. या सगळ्यांनी आपली भावी पिढी मानसिकदृष्टया दुबळी होत चालली आहे.

 

 

हे अध:पतन कुठेतरी थांबायला हवं. शिक्षणाने माणसातील माणूसपण जपले जावं… शिक्षण हे खऱ्या अर्थाने मस्तकस्पर्शी नाही तर जीवनस्पर्शी असावं…! आणि म्हणूनच जून १८९७ पासून महाराष्ट्र शासनाने मूल्यशिक्षण या विषयाचा प्राथमिक शिक्षणात अंर्तभाव केला.

 

शाळेत येणा-या या बालचमूंची पाटी तशी कोरीच पण या पाटीवर सद्गुणांचा ‘श्री गणेशा ‘ कोरुन संस्कारांची बाराखडी लिहण्याचे कार्य शाळा व शिक्षक यांच्याकडून सूयोग्य पद्धतीनं होणं अत्यंत गरजेचे आहे. कारण शालेय स्तरावरील मुलांचे बालमन हे अपरिपक्व संस्करक्षम असते या वयात जे काही बरे वाईट बिंबवले जाईल ते आत्मसात करण्याची त्याची तयारी असते. म्हणूनच “काय पेरायचं ? ” हे जास्त महत्त्वाचे ठरतं.

 

पूर्वी एकत्र कुटुंबपध्दतीमधे हे संस्कार’ अनौपचारिकरित्याच मुलांवर बिंबवले जायचे.प्रेम माया , त्याग , जबाबदारी इ. मूल्ये नव्याने मुलांना शिकविण्याची गरज नसायची . परंतू काळ बदलला.निसर्गातल्या संक्रमणाबरोबर कुटूंबव्यवस्थेचेही संक्रमण झाले. नोकरीच्या निमित्ताने, कामधंद्याच्या निमित्ताने स्त्री घराबाहेर पडली आणि मग ठिकठिकाणी ‘संस्कारवर्गांची’ आवश्यकता भासू लागली. शासनालाही ‘ मूल्यशिक्षण’ नावाचा वेगळा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा लागला ही खेदाची गोष्ट आहे .

आज म्हणूनच माणूस घडविणारे , त्यांना चारित्र्यवान करणारे शिक्षण आवश्यक आहे. कारण चारित्र्य ही निर्मिती असते. बांधणी असते Children are like wet cement Whatever falls takes an impression…” आणि म्हणून गरज आहे ती शिक्षणाच्या माध्यमातून या उगवत्या बालमनावर मूल्यांचा, सद्गुणांचा ठसा उमटवण्याची. घर-शाळा-समाज या त्रिकोणी वातावरणात बालमन उमलत असतं. याच वयात स्वच्छता स्वावलंबन श्रमप्रतिष्ठा, विज्ञाननिष्ठा समता, बंधुत्व, न्यायप्रियता, सौज्यन्यशीलता, देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता,इ. विधायक वृत्तींची निर्मिती ज्यामुळे घडेल असे अध्ययन अनुभव सुयोग्यरित्या प्राप्त करून देण्याचे काम पालकांसोबत शिक्षकांनीही करायला हवं त्यासाठी अनेक सहशालेय उपक्रमांचं आयोजन कल्पकतेने करण्याची भूमिका शाळा व शिक्षकांची असणं अभिप्रेत आहे.

 

“खरंतर मूल्याधिष्ठित शिक्षण’ एक चळवळच बनायला हवी. प्राथमिक शिक्षणात त्यासाठी वेगवेगळे सृजनशील प्रयोग करायला हवेत. या अरुण वयातूनच पूढे तरुणपणाचे अंकूर धुमारतात. पण त्याला सूर देणारे शिक्षक शाळेत आणि डोळस पालक घरात असतील तरंच. नाहीतर उद्याचा भारत घडवणारी ही प्रतापी उर्जा निष्प्रभ ठरेल. “हल्लीची मुल एकतंच नाहीत हो। हे आपल लाडकं सोयीचं सुभाषित दूर ठेवून, उद्याच्या सुंदर फुलांसाठी आजच्या कळयांना ‘मूल्यांच आकाश देवूया …संस्कारांच्या अनेक पाकळयांनी सद्गुणांच्या सुगंधाने त्यांना समृद्ध करूया. “चला निघुया सरसावोनी, देशाच्या उद्धरणी.”

Previous articleचंद्रकांत वारघडे यांचे वृक्षरोपणाचे काम कौतुकास्पद दिपक खलाने वनपरीक्षेत्र अधिकारी 
Next articleमहा आवास ग्रामीण पुरस्काराचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते वितरण