पोटात व हातावर सुरीने वार करणाऱ्या चुलत भावावर नारायणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

Ad 1

नारायणगाव (किरण वाजगे)

किरकोळ कारणावरून चुलत भावाने पोटात व दंडावर सुरीने वार केल्याबद्दल एक जणांवर नारायणगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.

याबाबत विशाल ज्ञानेश्वर मेहेर (राहणार वारूळवाडी, ता. जुन्नर) याच्यावर भा.द.वि. कलम ३०७, ५०६ नुसार दिनांक २६ जुलै रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत महेश सुरेश मेहेर (वय ३०, व्यवसाय खाजगी नोकरी, राहणार वारूळवाडी ता. जुन्नर) यांनी नारायणगाव पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.

या घटनेची अधिक माहिती अशी की,आमच्या मालकीच्या रस्त्यावरून ट्रॅक्टर का आणला असा जाब विचारत अंगावर धावून येऊन तसेच एका एकाला खलास करून टाकतो, अशी धमकी देऊन आरोपी विशाल ज्ञानेश्वर मेहेर याने खिशातील सुरी महेश मेहेर यांच्या पोटात खुपसली व डाव्या हाताच्या दंडावर मारून गंभीर दुखापत केली. ही घटना वारूळवाडी तालुका जुन्नर येथील पाण्याच्या टाकीजवळ दिनांक २६ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेवरून आरोपी विशाल ज्ञानेश्वर मेहेर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक व्ही. सी. झिंजुरके हे करीत आहेत.