अक्षय बोऱ्हाडे याच्यावर जुन्नर पोलिस स्थानकामध्ये खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

नारायणगाव – किरण वाजगे)

बेवारस दीन-दलित, बेघर, गरीब, वेडसर अशा लोकांची सेवा करून त्यांचा सांभाळ करणाऱ्या शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथील शिवऋण प्रतिष्ठानचा अध्यक्ष अक्षय बोऱ्हाडे याच्यावर जुन्नर पोलिस स्थानकामध्ये खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान अक्षय बोऱ्हाडे याने जुन्नरचे माजी नगरसेवक रुपेश शहा यांच्याकडे काही दिवसांपूर्वी माहितीच्या अधिकारात अर्ज करून खंडणी मागितली व पैसे दिले नाही तर खल्लास करीन या स्वरूपाची धमकी दिली. या रुपेश शहा यांच्या तक्रारीवरून अक्षय बोऱ्हाडे याला मंगळवारी (दि.३१ ऑगस्ट २०२१ रोजी) रात्री उशिरा अटक केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

दरम्यान बोऱ्हाडे याने त्याच्यावर गुन्हा दाखल होण्यापूर्वी काही वेळ अगोदर फेसबुक लाईव्ह द्वारे दोन धर्मामध्ये गैरसमज होऊन तेढ निर्माण होईल असे वक्तव्य थेट प्रसारित केले होते. तसेच जुन्नर चे नगराध्यक्ष श्याम पांडे यांच्या विषयी तसेच स्थानिक सर्वच पक्षांच्या नेत्यांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते.

याबाबत शिवसेना उपतालुका प्रमुख अविनाश कर्डिले उपनगराध्यक्ष दीपेश सिंह परदेशी तसेच शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी सह पदाधिकाऱ्यांनी अक्षय बोराडे याच्याविरोधात जुन्नर पोलीस स्थानकात तक्रार अर्ज केला आहे. कदाचित या घटनेवरून देखील अक्षय बोऱ्हाडे याला ताब्यात घेतले असावे अशी चर्चा केली जात आहे. याबाबत जुन्नर पोलिस स्थानकाशी संपर्क साधला असता ठाणे अंमलदार तथा पो.नाईक म्हस्के यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे

Previous articleराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दौंडमध्ये सायकल रॅली
Next articleधक्कादायक ; बिबट्याच्या हल्ल्यात 60 वर्षीय महिला ठार