तीन वर्षांपासून फरार असलेल्या बाळ्याला पोलीसांनी बेड्या ठोकल्या

नारायणगाव – (किरण वाजगे)

दोन गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या व मोक्का लागलेल्या कुख्यात दरोडेखोराला पुणे स्थानिक गुन्हे शाखेकडून सापळा लावून व सिनेस्टाईल पटलाग करून २४ ऑगस्ट रोजी अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी दिली .

बाळू उर्फ बाळ्या झारु भोसले (वय ४५ वर्ष रा. निघोज,ता पारनेर, जि. अहमदनगर) याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत .

आळेफाटा पोलीस ठाण्यात १४ डिसेंबर २०२० ला भादवि कलम ३९५,३९७ तसेच शिरूर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३९५ नुसार व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा १९९९ कलम ३ (१) असे गुन्हे दाखल झाले होते या दोन्ही गुन्ह्यांना मोक्का कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्यात आली होती. त्यामुळे या गुन्ह्यातील फरार आरोपींना लवकरात लवकर पकडण्याच्या सूचना पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.त्यानुसार या गुन्ह्यातील महत्वाचा आरोपी बाळू उर्फ बाळ्या भोसले हा गुन्हा घडल्या पासून फरार होता. तो जंगल व डोंगराळ भागात राहत असल्याने तो सहजा सहजी मिळणे शक्य होत नव्हते. फरार आरोपीचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बाळ्या भोसले ची माहिती घेण्या करीता वेष बदलून त्याच्या ठाव ठिकाण्याबाबत माहिती घेऊन बातमीदारा कडून पथकाला गोपनीय माहिती मिळाली असता फरार आरोपी बाळू भोसले हा बेल्हे येथे अळकुटी फाट्यावर असल्याचे समजताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून व सिनेस्टाईल पटलाग करून ताब्यात घेतले.त्याला पुढील तपासा करीता आळेफाटा पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे,पोलीस हवालदार दिपक साबळे, हनुमंत पासलकर, विक्रम तापकिर,संदिप वारे,अक्षय नवले, निलेश सुपेकर, दगडू वीरकर यांनी केली आहे.

Previous articleधर्मादाय खासगी रुग्णालयांची तपासणी करण्या संदर्भात संयुक्त समितीची बैठक
Next articleसर्पमित्रांनी सोशल मीडिया वापरताना काळजी घ्यावी – वनक्षेत्रपाल अजित शिंदे