लीळाचरित्र ग्रंथाला पर्यायी शब्द देऊन वाचकांना श्रीभास्करपाठ ग्रंथ नव्याने प्रकाशित – महंत कृष्णराज शास्त्री

उरुळी कांचन

महाराष्ट्रात आठशे वर्षापूर्वी महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचा अवतार होऊन गेला. त्यांनी आपल्या आचरणातून विचारप्रणालीतून महाराष्ट्रात एक सामाजिक परिवर्तनाची नांदी सुरु केली. जिचा पुढे महानुभाव संतानीच नव्हे तर वारकरी संप्रदायातील श्री ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, संत नामदेव आदींनी आपआपल्या परीने समाजसुधारणेच्या कार्यात बहुमोल असा वाटा उचलला म्हणूनच महाराष्ट्राला ‘संतांची भूमी ‘ असा बहुमान प्राप्त झाला.

अशा सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे चरित्र म्हाईंभट या विद्वान शिष्याने महानुभाव पंथाचे प्रथमाचार्य श्री नागदेव यांच्या मार्गदर्शनाखाली संकलित केले. ते ‘लीळाचरित्र’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्यात त्यावेळेच्या सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, परिस्थिती, चालीरीती आदींचे वर्णन वाचायला मिळते. याचे लेखन शके १२०८ मध्ये झाले होते, त्यानंतर इतर ग्रंथाची निर्मिती झाली. ‘आद्यमराठीगद्यग्रंथ’ हा बहुमान या ग्रंथाला मिळाला आहे. याच्या अभ्यासाशिवाय मराठीचा अभ्यासक पुढे जाऊच शकत नाही, पण आज मराठीभाषा बदललेली आहे. आठशे वर्षापूर्वीच्या शब्दांचे अर्थ आज कळत नाहीत. संशोधकांनी, ललितलेखकांनी, कवींनी, भावार्थाद्रारे, कथांद्वारे, काव्यांद्वारे त्याचे विश्लेषण करण्याचा सुत्य प्रयत्न केला आहे. तरी सुद्धा अर्थबोध होत नाही असे मत वाचकांच्या प्रतिक्रियेतून व्यक्त होत होते, हे लक्षात घेऊन महंत कृष्णराज शास्त्री पंजाबी (शिक्रापूर) यांनी आठशे वर्षापूर्वीच्या शब्दाला आजचा पर्यायी शब्द देऊन सामान्य वाचकाला सहज समजेल अशा पद्धतीने लीळाचरित्राचा शब्दानुवाद ‘श्रीभास्करपाठ ‘ या नावाने हजार पानांचा ग्रंथ अल्पकिंमतीत वाचकांना अभ्यासकांना उपलब्ध करून दिला आहे.

Previous articleअखिल भारतीय कलाकार महासंघाच्या वतीने दौंड मध्ये तहसीलदारांना निवेदन
Next articleआष्टापूर ग्रामपंचायतचे कार्य स्वच्छता विषयक चांगले सातत्य ठेवावे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के