गांजाची तस्करी करणाऱ्या वाहनास सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले

नारायणगाव (किरण वाजगे)

बेकायदेशीररित्या ६ किलो ९०० ग्रॅम गांजा घेऊन जाणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला त्याच्या चारचाकी सहित ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस व नारायणगाव पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई १६ ऑगस्ट रोजी रात्री करण्यात आली आहे. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी माहिती दिली.

आरोपी दीपक बच्चू तामचीकर (रा. धालेवाडी ता. जुन्नर जि. पुणे) हा त्याच्या कडे असणाऱ्या मारुती सुझुकी विटारा ब्रीजा क्रमांक एम एच १२ जी एच ४१७३ ही कार घेऊन पुणे बाजूकडून आळेफाटा बाजूकडे भरधाव वेगात तसेच रहदारीचे नियम तोडून जोरात जात असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना पेट्रोलिंग करत असताना दिसले. या कार चालकाची हालचाल संशयास्पद वाटल्याने नारायणगाव पोलिसांच्या मदतीने पोलीस स्टेशन समोरील गिरीजा हॉटेल जवळ या गाडीला अडवून गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये ६ किलो ९१५ ग्रॅम एवढ्या वजनाचा गांजा मिळाला आहे. या गांजाची एकूण किंमत १ लाख १५ हजार ७७५ रुपये असून गाडीची अंदाजे किंमत नऊ लाख रुपये आहे. अशाप्रकारे १० लाख १५ हजार ७७५ रुपये किंमतीच्या मुद्देमालासह आरोपीला अटक करण्यात आली आहे. दीपक तामचीकर हा सराईत आरोपी असून त्याच्यावर यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहायक फौजदार सुनील जावळे, प्रकाश वाघमारे, पोलीस हवालदार मुकुंद आयचित, समाधान नाईकनवरे तसेच नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस शिपाई लोहटे वाघमारे यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे हे करीत आहेत.

Previous articleमहाराष्ट्र राज्य विज विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी विपुल शितोळे यांची निवड
Next articleअखिल भारतीय कलाकार महासंघाच्या वतीने दौंड मध्ये तहसीलदारांना निवेदन