दिव्यांग अजय हिंगे यांना संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून वाढदिवसाला अनमोल भेट

नारायणगाव (किरण वाजगे)

१५ वर्षे अपघातामुळे अंथरुणावर खिळून असलेल्या अजय हिंगे पाटील व्हीलचेअरवर बसले
दि.९ ऑगस्ट २००६ रोजी लहानपणी सहलीला गेल्यानंतर समुद्राच्या लाटेमुळे झालेल्या अपघातात कायमचे अपंगत्व आले. त्यानंतर तब्बल १५ वर्षे अंथरुणावर खिळून राहिलेल्या अजय हिंगे पाटील यांना त्यांच्या वाढदिवशी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वयंचलित व्हीलचेअरची (सोमवारी) अनोखी भेट दिली. जिद्द, चिकाटी आणि दुर्दम्य आशावादी कार्यकर्त्याला दिलेल्या या अनोख्या भेटीची चर्चा पंचक्रोशीत रंगली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोशल मीडिया सेलचे सरचिटणीस पदावर काम करणारे अजय हिंगे पाटील हे शिरूर तालुक्यातील न्हावरा येथे स्थायिक आहेत. अपघातामुळे कायमचे अपंगत्व येऊन देखील परिस्थितीला शरण न जाता जिद्दीने जीवनसंघर्ष करणारे अजय हे पक्षासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रीय काम करत आहेत. त्यांच्या या जिद्दीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पार्टीचे अनेक वरिष्ठ नेते शिरूरला आले की अजय यांची आवर्जून भेट घेतात.

या अनोख्या गिफ्टबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना अजय हिंगे पाटील म्हणाले, “१५ वर्षांपूर्वी बारावी पास झाल्यानंतर रांजणगाव एमआयडीसीमध्ये एका ठिकाणी नोकरी लागली. सगळे काही सुरळीत सुरू होते. पण अचानक एक दिवस म्हणजे २० जून २००६ रोजी जीवघेणा अपघात झाला आणि सारेच संपले. तीन महिने पुण्याच्या बुधराणी रुग्णालयात उपचार सुरू होते. इतके दिवस उपचार करूनही मी पुन्हा उभा राहीन याची शाश्वती स्वतः डॉक्टरही देत नव्हते. मणक्याला गंभीर इजा झाली होती. कायमस्वरूपी झोपून रहावे लागेल हाच एकच मार्ग सांगितला. त्यानंतर हताश अवस्थेत छताकडे डोळे लावून पडून रहात होतो. कायमचे अपंगत्व आल्यामुळे मी काहीसा निराश झालो होतो.

“आयुष्यभर झोपूनच राहणार असे जवळ जवळ निश्चित झालेल्या मला चक्क ही व्हीलचेअर वाढदिवसाची भेट म्हणून मिळाली आहे. अक्षरशः माझा पुनर्जन्मच झाल्याचा भास आज झाला. काहीजण सोशल मीडियातून, तर काहीजण फोन करून, तर कोणी प्रत्यक्ष भेटून मला शुभेच्छा देत होते. परंतु त्याचवेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ही व्हीलचेअर भेट दिली आणि जणू मला सांगितले, ‘अजयशेठ ‘नाऊ यू कॅन स्टँड’.’ माझे मन भरून आले आहे.”
“खा. कोल्हे यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक बापू पवार यांनी वेळोवेळी माझ्या पाठीवर हात ठेवून आयुष्याशी लढण्याचे बळ दिले. या बळाच्या जीवावर आणि त्यांच्या सहकार्याने आयुष्यात कोणत्याही आव्हानासमोर छाती ठोकून मी उभा राहू शकतो असा विश्वास या सर्वांनी मला दिला आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
काही महिन्यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदार संघातील अनेक दिव्यांग बांधवांना आतापर्यंत आवश्यक ती साधने दिली गेली आहेत. अजय हिंगे पाटील यांचे बालमित्र सुदर्शन जगदाळे यांना ‘ऑटोमॅटिक व्हीलचेअर’ दिली गेली आहे. तब्बल पंधरा वर्षानंतर सुदर्शन स्वतःच्या पायावर उभे राहू शकत आहेत.

त्याच धर्तीवर अजय यांना देखील ऑटोमॅटिक व्हीलचेअर मिळू शकते ही बाब खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या लक्षात आली. त्यांनी त्यांच्या टीमला कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानंतर कोल्हे यांचे स्वीय सचिव नाना सावंत, खा.सुळे यांच्या सोशल मीडिया टीमचे समन्वयक, स्टर्लिंग सिस्टिमचे संचालक सतिश पवार यांच्यासह संपूर्ण टीमने अथक प्रयत्न करून तब्ब्ल ३ लाख रुपये किमतीची व्हीलचेअर मिळवून दिली. आवश्यक त्या शासकीय परवानग्या व कागदपत्रांची पूर्तता करत व्हीलचेअर मागवून घेण्यासाठी केलेल्या सामुहिक प्रयत्नांना अखेर यश मिळाले. खासदार कोल्हे यांनी अजय हिंगे पाटील यांच्या वाढदिवसाला दिलेल्या या अनोख्या गिफ्टची चर्चा पंचक्रोशीत रंगली आहे.

आता प्रतिक्षा खासदार कोल्हे यांच्यासमवेत सेल्फीची…!

माझ्या वाढदिवसाला इतकी अनमोल भेट देणाऱ्या खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेबांना मला या व्हील चेअरसोबत भेटायचं आहे. त्यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आणि त्यांचासोबत एक सेल्फी पण घ्यायचा आहे. त्यामुळे त्यांची अगदी आतुरतेने वाट पाहतोय, अशा भावना अजय हिंगे पाटील यांनी व्यक्त केल्या.

“अजय हिंगे आणि सुदर्शन जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मिडियाचे काम सांभाळणारे दोन खंदे वीर. दिव्यांग असूनही धडधाकट व्यक्तींच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्यापेक्षा अधिक जोमाने काम करणारे हे दोन्ही वीर सोशल मीडियावर पक्षाचे, खासदार म्हणून खासदार, आमदारांचे काम जनतेपर्यंत पोहोचविण्याबरोबरच विरोधकांच्या हल्ल्यांना निष्प्रभ करण्याचे काम करीत असतात. त्यामुळे अजय यांना पुन्हा उभं करणे हे माझ्यादृष्टीने महत्वाचं होतं. मी काही खूप मोठं केलं असं म्हणणार नाही. जो कार्यकर्ता आपल्यासाठी रात्रंदिवस राबतो, त्याला उभं करणं हे माझं कर्तव्य होतं आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते मी केलं. माझी खात्री आहे की, या स्वयंचलित व्हिलचेअरवर उभं राहून अधिक जोमाने पक्षाचे काम करतील अशा आशयाच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी अजयशेठना शुभेच्छा दिल्या आहेत”

Previous articleदावडीत वडीलांची डोक्यात लोखंडी घण घालून मुलाने केली हत्या
Next articleघोडेगावचे पंकज पारखे यांची पोलिस नाईकपदी पदोन्नोती