पीएमआरडीएकडून ८१७.५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश

अमोल भोसले

शिरुर लोकसभा मतदारसंघातील खेड, शिरुर आणि हवेली तालुक्यातील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सुचविलेल्या रु.८१७.५ लक्ष रकमेच्या विविध रस्त्यांच्या कामांना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) ने सन २०२१-२२ च्या आराखड्यांतर्गत मंजुरी दिली आहे.

कोविड १९ चे जागतिक महामारीच्या काळात केंद्र सरकारने सन २०२०-२१ व २०२१-२२ असा दोन वर्षांचा रु.१० कोटींचा खासदार निधी अन्य कामांसाठी वळविला असला तरी अन्य योजनांतून भरघोस निधी आणण्यात डॉ. कोल्हे यशस्वी झाले असून मतदारसंघातील विकासकामांचा ओघ त्यांनी कायम ठेवला आहे. ‘पीएमआरडीए’च्या सन २०२१-२२ च्या आराखड्यांतर्गत शिरुर तालुक्यातील मौजे निमगाव भोगी ते सोनेसांगवी (इजिमा १४६) रस्त्याचे बांधकाम करणे (रु. १०१.०० लक्ष), मौजे गणेगाव येथील वरुडे, चिंचोशी, कान्हुरमेसाई (इजिमा १४२) रस्त्याचे बांधकाम करणे (रु. १३५.०० लक्ष), हवेली तालुक्यातील नायगाव थेऊर शिवरस्ता करणे (रु.२८१.५० लक्ष), खेड तालुक्यातील मौजे सुतारवाडी अंतर्गत प्रजिमा १७ ते सुतारवाडी रस्ता सुधारणा करणे (रु.७५.०० लक्ष), वाफगाव ते मांदळेवाडी (ग्रा.मा.७१) रस्ता करणे (रु. ७५.०० लक्ष), मौजे आखरवाडी अंतर्गत गावठाण ते ढमढेरे वस्ती रस्ता करणे (रु. ७५.०० लक्ष) आणि मौजे तोरणे येथील तोरणे पराळे जोडरस्ता (शिवरस्ता) करणे (रु.७५.०० लक्ष) आदी रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.

तसेच यापूर्वी कोरेगाव भीमा ते वढू बु. प्रजिमा १९ या ३.२५० कि.मी. लांबीच्या रस्त्यापैकी कि.मी.००/०० ते कि.मी. ९५०/०० लांबीचे १० मीटर रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्यासाठी साडेसहा कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे खासदार डॉ. कोल्हे यांनी ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून आतापर्यंत साडेचौदा कोटींची विकासकामे मंजूर करुन आपल्या कामांचा धडाका कायम ठेवला असल्याचे स्पष्ट होत आहे.

या संदर्भात खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, खासदार म्हणून निवडून आल्यानंतर अवघ्या ७-८ महिन्यांत कोविडचे संकट आले. केंद्र सरकारने २ वर्षांचा खासदार निधी रद्द केला. अशा परिस्थितीत विकासकामे करण्यासाठी लोकांच्या अपेक्षांचे खूप मोठे ओझे शिरावर होते. पण त्याही परिस्थितीत मार्ग काढून विकासाची प्रक्रिया अविरत सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करीत होतो. या प्रयत्नांना राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजितदादा पवार यांनी खूप मोठे मोलाचे सहकार्य केले. त्यामुळेच शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर निधी आणता आला. याखेरीज आमदार अॅड. अशोक बापू पवार, आमदार दिलीप मोहिते पाटील यांनीही चांगली साथ दिली. त्यामुळे एकमेकांच्या सहकार्याने मतदारसंघातील विकासकामे करण्यात आम्हाला यश येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यश येत आहे हीच समाधानाची बाब आहे, असे खा. डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

Previous articleराज्यपाल भगतसिंग कोषारी व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते डॉ पिंकी कथे यांना राज्यस्तरीय पुरस्कार
Next articleनिर्भीड पत्रकार राजेंद्र सोनवलकर यांना कोरोना योद्धा पुरस्कार प्रदान